बारामतीत टंचाई आराखड्याचा सविस्तर आढावा; पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज
बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बारामतीत टंचाई आराखड्याचा सविस्तर आढावा; पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज
बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज पंचायत समितीच्या सभागृहात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. उन्हाळा तीव्र होत असताना ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजनांवर सखोल चर्चा केली.
बैठकीच्या प्रारंभी तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाणारे कै. मा. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर बैठकीला उपस्थित मान्यवरांनी कामकाजाला सुरुवात केली.
या बैठकीस पंचायत समितीचे सभापती किरणदादा तावरे, उपसभापती शुभांगी आगवणे, गटविकास अधिकारी किशोर माने, गटनेते बाबा चोरमले, उपगटनेते नितीन काकडे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता जगताप,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता अश्विनी मेश्राम, विविध विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या कामांची प्रगती, अडचणी आणि पुढील नियोजन यावर चर्चा करण्यात आली. यासोबतच नवीन बोअरवेल घेणे, विहिरींचे पुनर्भरण, तसेच तलावांमधील गाळ काढण्याबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मागण्या मांडल्या.
ज्या गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे, त्या ग्रामपंचायतींनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक मागण्या विलंब न करता नोंदवाव्यात, असे आदेश देण्यात आले.
प्रशासनाकडून या सर्व प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.याशिवाय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विविध योजनांचाही सखोल आढावा घेऊन कामांच्या गतीला चालना देण्याचे निर्देश देण्यात आले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत यांच्यात समन्वय राखण्यावर भर देण्यात आला.
बैठकीच्या शेवटी सभापती किरणदादा तावरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत, तालुक्यातील कोणतेही गाव पाणीअभावी त्रस्त राहणार नाही यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.






