शेजारी दौंडला १००% शास्ती माफी, तर बारामतीमध्ये फक्त ५०%; नागरिक संभ्रमावस्थेत
बारामतीत वेगळी भूमिका का?

शेजारी दौंडला १००% शास्ती माफी, तर बारामतीमध्ये फक्त ५०%; नागरिक संभ्रमावस्थेत
बारामतीत वेगळी भूमिका का?
बारामती वार्तापत्र
शेजारील दौंड नगरपरिषदेत मिळकत करावर १०० टक्के शास्ती माफी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बारामतीतील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बारामती नगरपरिषदेकडून केवळ ५० टक्के शास्ती माफी जाहीर करण्यात आल्यामुळे मिळकतदार नागरिक द्विधा मनस्थितीत अडकले आहेत.
सध्या शहरातील अनेक नागरिक “कर भरावा की थांबावे?” या प्रश्नात अडकले असून, पुढे जाऊन १०० टक्के माफी मिळणार की सध्याच्या ५० टक्क्यांवरच समाधान मानावे लागणार, याबाबत स्पष्टता नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
काही नागरिकांनी सांगितले की, “दौंडमध्ये पूर्ण माफी मिळत असेल, तर बारामतीत वेगळी भूमिका का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. विशेषतः नगराध्यक्षांनी याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, करसंकलन प्रक्रियेतही याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक मिळकतदारांनी सध्यातरी कर भरणे टाळल्याचे समजते. यामुळे नगरपरिषदेच्या महसुलावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकीकडे शेजारील नगरपरिषदेतील निर्णय आणि दुसरीकडे बारामतीतील वेगळी अंमलबजावणी यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर याबाबत स्पष्टता देत संभ्रम दूर करणे गरजेचे आहे.






