स्थानिक

बारामतीतील जळोचीमध्ये भैरवनाथ यात्रा साधेपणाने पार पाडण्याचा निर्णय

एकमताने उत्सवातील जल्लोष टाळत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय

बारामतीतील जळोचीमध्ये भैरवनाथ यात्रा साधेपणाने पार पाडण्याचा निर्णय

एकमताने उत्सवातील जल्लोष टाळत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय

बारामती वार्तापत्र 

बारामतीतील जळोची येथील अक्षय तृतीया निमित्त आयोजित करण्यात येणारा श्री भैरवनाथ यात्रा उत्सव यंदा अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडण्याचा निर्णय भैरवनाथ यात्रा कमिटीने घेतला आहे.

परंपरेनुसार गुढी पाडव्याच्या दिवशी श्री महाकाळेश्वर मंदिरात यात्रा कमिटीची बैठक घेऊन वर्गणी पुस्तक पूजन करून उत्सवाची तयारी सुरू केली जाते. मात्र, राज्याचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे यंदा सर्व ग्रामस्थांनी एकमताने उत्सवातील जल्लोष टाळत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदाच्या उत्सवात कोणत्याही प्रकारचा मोठा कार्यक्रम, सांस्कृतिक सोहळे किंवा जल्लोष न करता धार्मिक विधी अत्यंत साधेपणाने पार पाडण्यात येणार आहेत. यामध्ये देवाचा अभिषेक, देवाचे लग्न, तसेच पालखी मिरवणूक हे विधी पारंपरिक पद्धतीने होतील. मात्र, मिरवणुकीदरम्यान गुलालाची उधळण टाळण्यात येणार असून फक्त ढोल वादनासह शांततेत कार्यक्रम पार पाडला जाणार आहे.

भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले की, सध्याच्या शोकपूर्ण वातावरणाचा आदर राखत हा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील सर्व नागरिकांनीही या निर्णयाला सहमती दर्शवली असून उत्सव साध्या स्वरूपात साजरा करण्यास पाठिंबा दिला आहे.

यापूर्वीही मागील महिन्यात जळोची येथे महाशिवरात्री उत्सव रद्द करण्यात आला होता. त्या वेळीही श्री महाकाळेश्वर मंदिरात धार्मिक विधी साध्या पद्धतीने करून महाशिवरात्री साजरी करण्यात आली होती.

यंदाही त्याच धर्तीवर श्री भैरवनाथ यात्रा उत्सव साजरा होणार असून, ग्रामस्थांमध्ये श्रद्धा व परंपरा जपत संयमित वातावरणात धार्मिक कार्यक्रम साधेपणाने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे.

Back to top button