“माणुसकी आणि नात्याचा सण : रमजान ईद” – गोजूबावी येथे साधेपणात अजितदादाना वाहिली श्रद्धांजली
सामाजिक ऐक्य आणि एकोप्याचे उदाहरण

“माणुसकी आणि नात्याचा सण : रमजान ईद” – गोजूबावी येथे साधेपणात अजितदादाना वाहिली श्रद्धांजली
सामाजिक ऐक्य आणि एकोप्याचे उदाहरण
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील गोजूबावी गावात यंदाची रमजान ईद अत्यंत भावनिक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या वातावरणात साजरी करण्यात आली. ईद हा आनंद, बंधुता आणि उत्साहाचा सण असला तरी, गावातील समस्त मुस्लिम बांधवांनी यंदा सण साजरा करताना वेगळा निर्णय घेतला.
त्यांनी उत्सवाच्या धामधुमीऐवजी, स्व. अजित पवार यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.
गावातील मशिदीमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमलेल्या मुस्लिम समाजाने शांततेत प्रार्थना करून दिवंगत नेत्यांच्या कार्याची आठवण जागवली.
त्यांच्या योगदानाची उजळणी करत, “सण हा केवळ आनंदाचा नसून, माणुसकी जपण्याचा आणि नात्यांची कदर करण्याचा असतो,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी गोजूबावीतील ग्रामस्थ, युवक आणि विविध समाजघटकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
सर्वांनी मिळून साधेपणाने ईद साजरी करत, सामाजिक ऐक्य आणि एकोप्याचे उदाहरण घालून दिले. गावातील तरुणांनीही या उपक्रमात पुढाकार घेत, व्यवस्था आणि सहकार्याची जबाबदारी सांभाळली.
या उपक्रमातून बारामती तालुक्यातील सामाजिक सलोखा आणि परस्पर आदराची भावना अधोरेखित झाली. “एकता आणि अखंडता” जपण्याचा हा प्रयत्न केवळ श्रद्धांजली नसून, समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
समस्त गोजूबावीकरांच्या वतीने, या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांचे, ग्रामस्थांचे आणि युवकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.






