स्थानिक

बारामतीत ग्रामीण भागातील युगेंद्र पवार आक्रमक;सायंकाळी लोडशेडिंग थांबवण्याची मागणी

"शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असून, सातत्यपूर्ण व नियोजित वीजपुरवठा अत्यावश्यक आहे.

बारामतीत ग्रामीण भागातील युगेंद्र पवार आक्रमक;सायंकाळी लोडशेडिंग थांबवण्याची मागणी

“शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असून, सातत्यपूर्ण व नियोजित वीजपुरवठा अत्यावश्यक आहे.

बारामती वार्तापत्र

बारामती शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी आज पदाधिकाऱ्यांसह बारामती येथील ऊर्जा भवन येथे महावितरणचे बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी विविध समस्यांकडे लक्ष वेधत लेखी निवेदन सादर केले व सविस्तर चर्चा केली.

ग्रामीण भागातील गावठाण फीडर व कृषीपंप वीजपुरवठ्यातील असमतोल, वारंवार होणारे लोडशेडिंग, तसेच सायंकाळी होणाऱ्या फोर्स लोडशेडिंगमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत युगेंद्र पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषतः परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारा विपरीत परिणाम आणि शेतकऱ्यांना वेळेवर पाणी न मिळाल्याने पिकांचे होणारे नुकसान याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

खांडज, पणदरे, माळेगाव व ढेकळवाडी यांसह आवश्यक त्या सर्व गावांमध्ये सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. शहर व ग्रामीण भागात दीर्घकाळ सुरू असलेले वीज भारनियमन ही केवळ तांत्रिक अडचण न राहता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि शेती व्यवसायावर गंभीर परिणाम करणारी समस्या बनल्याचेही त्यांनी नमूद केले. रोजच्या अतिरिक्त चार तासांच्या भारनियमनामुळे शेतकरी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या अडचणीत सापडले असून, विशेषतः सायंकाळच्या वेळेत वीज नसल्याने जनावरांची देखभाल, दूध काढणे, घरगुती कामे व मुलांचा अभ्यास विस्कळीत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असून, सातत्यपूर्ण व नियोजित वीजपुरवठा अत्यावश्यक आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडत आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून वीजपुरवठा स्थिर व विश्वासार्ह करावा,” अशी ठाम भूमिका युगेंद्र पवार यांनी मांडली.

मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनीही सर्व बाबी गांभीर्याने ऐकून घेत लवकरच योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष ॲड. राजेंद्र जगताप, नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेत्या आरती शेंडगे-गव्हाळे, युवक शहराध्यक्ष ॲड. बळवंत बेलदार पाटील, युवक तालुकाध्यक्ष संदीप देवकाते, युवती शहराध्यक्षा राणी नवले, नितीन तावरे, पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष पैगंबर शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button