
पुणे येथे बारामतीतील टी.सी महाविद्यालयाचा दबदबा कायम
लोकनृत्यातील पारंपरिक सादरीकरण
बारामती वार्तापत्र
बारामती – पुणे येथे संपन्न झालेल्या मॉर्डन लॉ कॉलेज,पुणे आयोजित विधीरंग-२०२६ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेत टी.सी महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर पुन्हा एकदा दबदबा सिद्ध केला.
या स्पर्धेत लोकनृत्य, मुकनाट्य व प्रहसन या कला प्रकारांमध्ये टी.सी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तसेच परीक्षकांनीही त्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.
लोकनृत्यातील पारंपरिक सादरीकरण, मुकनाट्यातील प्रभावी अभिनय आणि जिवंत व ज्वलंत विषयावर प्रहसन सादरीकरण यामुळे टी.सी महाविद्यालयाने सर्वच स्तरांवर आपली छाप पाडली.
प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. भिमराव तोरणे, प्रा. सोमनाथ कदम आणि प्रा.राजेंद्र कंडरे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी सांस्कृतिक विभागाचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.






