शैक्षणिक

न्यू इंग्लिश स्कूल डोर्लेवाडीचे पर्यवेक्षक धनाजी मोरे यांचा गौरवशाली निरोप समारंभ संपन्न

रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीत मोरे सरांचे योगदान आदर्शवत : सहसचिव बंडू नारायण पवार

न्यू इंग्लिश स्कूल डोर्लेवाडीचे पर्यवेक्षक धनाजी मोरे यांचा गौरवशाली निरोप समारंभ संपन्न

रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीत मोरे सरांचे योगदान आदर्शवत : सहसचिव बंडू नारायण पवार

डोर्लेवाडी: प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील पर्यवेक्षक मा. श्री. धनाजी नामदेव मोरे हे आपल्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त विद्यालयाच्या वतीने ‘सेवानिवृत्ती व गौरव सोहळा’ अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव मा. श्री. बंडू नारायण पवार उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती पंचायत समितीचे सभापती श्री. किरण तावरे होते. यावेळी व्यासपीठावर डोर्लेवाडी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. सुप्रियाताई मनोज नाळे,  शेंडे नितीन वामनराव*विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. तुकाराम शंकर खताळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सहसचिव बंडू नारायण पवार म्हणाले की, “मोरे सरांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात रयत शिक्षण संस्थेची ध्येयधोरणे आणि मूल्ये निष्ठेने जपली आहेत.

विद्यार्थ्यांविषयीची आत्मीयता आणि शिस्तबद्ध प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांनी विद्यालयाचा दर्जा उंचावण्यात मोठी भूमिका बजावली आहे.

त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा.”
अध्यक्षीय भाषणात श्री. किरण तावरे यांनी मोरे सरांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सरपंच सौ. सुप्रियाताई नाळे यांनीही ग्रामस्थांच्या वतीने मोरे सरांच्या ऋणातून मुक्त होता येणार नाही, अशा भावना व्यक्त करत त्यांचा गौरव केला. तर शिक्षक मनोगत विद्यालयाचे उपशिक्षक श्री. भोंग वैभव यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपशिक्षक श्री. कांबळे आनंदा यांनी प्रास्ताविकातून मोरे सरांच्या ३० वर्षांहून अधिक काळाच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन उपशिक्षिका सौ. यादव स्वाती व सौ. जाधव उज्वला यांनी केले.

शेवटी शिक्षक श्री. भोसले नामदेव यांनी विद्यालयाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व नातेवाईकांचे आभार मानले.

या सोहळ्याला धनाजी मोरे सर यांचे सर्व नातेवाईक, शालेय समितीचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button