बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून ‘या’ 6 जणांची माघार
एकूण ५३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून ‘या’ 6 जणांची माघार
एकूण ५३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
बारामती वार्तापत्र
राज्यातील विधानसभा निवडणुकांपेक्षा सध्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुका अधिक चर्चेत आहेत.
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून संपूर्ण राज्याचे लक्ष या दोन्ही पोटनिवडणुकांकडे लागले आहे.
जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तसतशा नवनवीन राजकीय घडामोडी समोर येत आहेत. बारामती पोटनिवडणुकीसाठी एकूण ५३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आज सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
यामुळे आता उमेदवारांची संख्या ४७ पर्यंत खाली आली आहे. अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांमध्ये विलास होळकर, माऊली कांबळे, रजाक मुलाणी, राहुल थोरात, अमोल कोकरे आणि अशोक खामगळ यांचा समावेश आहे.
उद्या गुरुवार, ९ एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या अजून किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बराचश्या उमेदवारांनी माघार घेतल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी ही निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे चित्र आहे.
बिनविरोधसाठी प्रयत्न, पण…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, महायुतीने विरोधकांकडे बिनविरोध निवडणुकीसाठी विनंती केली होती. सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांना फोन करून पाठिंबा मागितला होता.
सुरुवातीला निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वाटत होती. मात्र काँग्रेसने आपला उमेदवार आकाश मोरे यांना रिंगणात उतरवल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायुतीकडून काँग्रेसला उमेदवार मागे घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उद्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बारामतीत मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. किती उमेदवार शेवटी रिंगणात राहतात, यावरच बिनविरोध की चुरशीची लढत याचा फैसला होणार आहे.
बारामती पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होणार असून, मतमोजणी ४ मे रोजी होईल. या निवडणुकीकडे फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






