वीर धरणातून ६,०३७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग; नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
वीर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे.

वीर धरणातून ६,०३७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग;
नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
वीर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे.
बारामती वार्तापत्र
नीरा खोऱ्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून, धरणातून नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
नीरा उजवा कालवा विभाग, फलटणचे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. ८ जुलै) सायंकाळी ६ वाजता वीर धरणाच्या सांडव्यावरून ४,६३७ क्यूसेक आणि एस्केपमधून १,४०० क्यूसेक असा एकूण ६,०३७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
नीरा देवघर, भाटघर आणि गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून, बुधवारी सकाळी ९ वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी ५७६.७५ मीटर इतकी नोंदविण्यात आली. सध्या धरणात ६७.३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे की, पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार नदीपात्रातील विसर्गात वेळोवेळी वाढ अथवा घट केली जाऊ शकते. त्यामुळे नदीपात्र तसेच सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही जोखीम टाळावी.
—-
प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना
* नदीपात्रात किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये.
* नदीकाठावरील जनावरे, शेतीसाठी ठेवलेले साहित्य आणि यंत्रसामग्री तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावी.
* सखल भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
* स्थानिक प्रशासन व पाटबंधारे विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
नीरा नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांनुसारच वर्तन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






