अखेर बहुचर्चित दूध संघाचा चेअरमनपदाचा राजीनामा पुन्हा चर्चेत; पोटनिवडणुकीनंतर निर्णयाची शक्यता?
काही संचालकांनी अलीकडेच युवा नेत्यांची भेट

अखेर बहुचर्चित दूध संघाचा चेअरमनपदाचा राजीनामा पुन्हा चर्चेत; पोटनिवडणुकीनंतर निर्णयाची शक्यता?
काही संचालकांनी अलीकडेच युवा नेत्यांची भेट
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील बहुचर्चित दूध संघाच्या राजीनाम्याचा विषय पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या राजीनाम्याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असतानाच, विधानसभा पोटनिवडणुकीनंतर या घडामोडींना वेग येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता दूध संघातील पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे दिवंगत नेते अजित पवार हे प्रत्यक घटकाला संधी देत होते.परंतु दूध संघाच्या चेअरमनपदी पुन्हा त्याच चेअरमनाची निवड करण्यात आली.त्यामुळे बाकी संचालकांना संधी कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजकीय वर्तुळात सध्या “पोटनिवडणूक पार पडली,आता पुढे काय?” अशी चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, संघातील काही संचालकांनी अलीकडेच युवा नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत असून, त्या भेटींनंतर राजीनाम्याच्या चर्चेला अधिकच उधाण आले आहे. या भेटींमध्ये संघाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत तसेच आगामी निर्णयांबाबत चर्चा झाल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ते बारामतीत परतल्यानंतर पहिला मोठा राजीनामा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू आहे. त्यामुळे दूध संघातील अंतर्गत हालचालींना वेग आला असून, काही पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढल्याचेही सांगितले जात आहे.
दूध संघाच्या कारभाराबाबत गेल्या काही काळात विविध मुद्द्यांवरून नाराजी व्यक्त होत होती. काही संचालकांकडून संघातील निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता संभाव्य राजीनाम्याची चर्चा पुन्हा रंगू लागल्याने बारामतीतील सहकार आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.
सध्या अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसली तरी, पुढील काही दिवसांत मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दूध संघातील नेमके काय घडणार, कोण पद सोडणार आणि त्यानंतर नवीन समीकरणे कशी तयार होणार याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.






