गर्भपात प्रकरणात फलटणच्या डॉक्टरला अटक; बारामतीतील त्या हॉस्पिटलवरील कारवाईचे काय?
रुग्णालयाची झाडाझडती घेत महत्त्वाची कागदपत्रे आणि काही धागेदोरे ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

गर्भपात प्रकरणात फलटणच्या डॉक्टरला अटक; बारामतीतील त्या हॉस्पिटलवरील कारवाईचे काय?
रुग्णालयाची झाडाझडती घेत महत्त्वाची कागदपत्रे आणि काही धागेदोरे ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
क्राईम;बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि त्यानंतर झालेल्या कथित बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणात फलटण येथील डॉक्टरला अटक झाल्यानंतर बारामतीतील संबंधित हॉस्पिटलवरील कारवाईबाबत नवे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एकीकडे पोलिसांकडून अटक आणि चौकशीची कारवाई होत असताना, दुसरीकडे बारामतीतील चर्चेत असलेल्या हॉस्पिटलविषयी अद्याप ठोस कारवाई का झाली नाही, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
या प्रकरणात फलटण येथील डॉ. योगेश नरुटे आणि बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथील पिंटू धुमाळ यांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी पोलिसांनी डॉ. नरुटे यांच्या फलटण येथील रुग्णालयाची झाडाझडती घेत महत्त्वाची कागदपत्रे आणि काही धागेदोरे ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणा आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या माध्यमातून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार झाला होता. त्यानंतर ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यावर तिला उपचारासाठी फलटण येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गर्भपात करताना कायद्याने आवश्यक असलेल्या वैद्यकीय प्रक्रिया, शासकीय परवानग्या आणि बालसंरक्षण नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात वैद्यकीय नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, अत्याचार प्रकरणातील एक संशयित पोलिस कोठडीत असताना आत्महत्या केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. त्यामुळे आता केवळ अत्याचारच नव्हे, तर संपूर्ण गर्भपात प्रक्रियेत नेमके कोण-कोण सहभागी होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मुख्य आरोपी कोण, पीडित मुलीवर अत्याचार नेमका कोणी केला, तसेच या प्रकरणामागे आणखी काही व्यक्ती किंवा साखळी कार्यरत होती का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.
या प्रकरणात सर्वाधिक चर्चा बारामतीतील कथित “स्त्री बीज” प्रकरणाशी संबंधित हॉस्पिटलच्या भूमिकेबाबत सुरू झाली आहे. त्या हॉस्पिटलवरील चौकशी अहवाल अद्याप समोर आलेला नसल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून “राजकीय दबावामुळे कारवाई थांबली आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे काही जण “तपास सुरू असल्यामुळे अधिकृत माहिती जाहीर करण्यात विलंब होत आहे,” असे मत व्यक्त करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये सध्या उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, एकीकडे काहींवर तत्काळ कारवाई होत असताना दुसरीकडे काही ठिकाणी शांतता का आहे, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील चौकशी अहवाल कधी समोर येणार आणि संबंधित हॉस्पिटलवर नेमकी कोणती कारवाई होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
वडगाव निंबाळकर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून सपोनि नागनाथ पाटील अधिक तपास करत आहेत. तपासात मिळालेल्या धाग्यांच्या आधारे अशा प्रकारचे आणखी बेकायदेशीर गर्भपात झाले आहेत का, तसेच यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही शोध घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे.






