स्थानिक

बारामतीत गॅस तुटवड्याच्या नावाखाली काळाबाजार; जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम आकारून गॅस सिलेंडरची विक्री

बारामतीत गॅस तुटवड्याच्या नावाखाली काळाबाजार; जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम आकारून गॅस सिलेंडरची विक्री

बारामती वार्तापत्र

बारामती : बारामती शहर व तालुक्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काही गॅस एजन्सी चालक, वितरक व संबंधित व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडरचा साठा करून काळाबाजार केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यामुळे सामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक तसेच हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांकडून तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी, बारामती यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित प्रकाराची तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, काही ठिकाणी ग्राहकांना वेळेवर गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जात नसून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. त्याचबरोबर शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम आकारून गॅस सिलेंडरची विक्री केली जात असल्याचे प्रकारही समोर येत आहेत. व्यावसायिक वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर अवैधरित्या साठवून जादा दराने विक्री केल्यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सदर प्रकार हा अत्यावश्यक वस्तू अधिनियम तसेच शासनाच्या पुरवठा नियमांचे उल्लंघन करणारा असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

* बारामती शहर व तालुक्यातील गॅस एजन्सी, गोदामे व संशयित ठिकाणी तात्काळ छापेमारी करण्यात यावी.
* व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरचा अवैधरित्या साठा करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.
* जादा दराने गॅस विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
* नागरिकांना शासनाच्या निर्धारित दरानुसार नियमित गॅस पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात.
* दोषी आढळणाऱ्या एजन्सी किंवा संबंधित व्यक्तींचे परवाने निलंबित करून कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

सामान्य नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे, मन्सूर शेख आणि निलेश जाधव यांनी केली आहे.

Back to top button