स्थानिक

बारामतीच्या पिंपळी येथील तरुणाचा लोणावळ्यातील वॉटर पार्कमध्ये उष्माघाताने मृत्यू

वॉटर पार्कमधील साहसी खेळांचा आनंद घेत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगितले जात आहे

बारामतीच्या पिंपळी येथील तरुणाचा लोणावळ्यातील वॉटर पार्कमध्ये उष्माघाताने मृत्यू

वॉटर पार्कमधील साहसी खेळांचा आनंद घेत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगितले जात आहे

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील पिंपळी गावचा रहिवासी असलेल्या २८ वर्षीय सनी तानाजी यादव याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण बारामती तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

लोणावळ्यात मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या सनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, त्याच्या मृत्यूमागे उष्माघात की हृदयविकाराचा तीव्र झटका हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

काही दिवसांपूर्वीच बारामतीतील २३ वर्षीय तरुणाच्या अकस्मात मृत्यूची घटना ताजी असतानाच आता सनी यादवच्या निधनाने परिसर सुन्न झाला आहे. सनी आपल्या मित्रांसोबत लोणावळ्यातील एका वॉटर पार्कमध्ये फिरण्यासाठी गेला होता. यावेळी त्यांनी वॉटर पार्कमधील बंदिस्त पाईपलाईनजवळ एक व्हिडिओ आणि सेल्फी घेतल्याचे समोर आले आहे. हाच व्हिडिओ आता त्याचा शेवटचा ठरल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.

वॉटर पार्कमधील साहसी खेळांचा आनंद घेत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगितले जात आहे. एरवी तरुणाईचा उत्साह आणि आनंदाचे प्रतीक असणारे हे वॉटर पार्कचे दृश्य एका कुटुंबासाठी कायमचे दुःख देऊन गेले.

सनी यादव हा पिंपळी येथील तानाजी यादव यांचा मुलगा असून तो हौशी छायाचित्रकार म्हणून परिसरात परिचित होता. मनमिळावू स्वभाव, मित्रपरिवारातील लोकप्रियता आणि आर्थिकदृष्ट्या गरजू लोकांना वेळोवेळी केलेली मदत यामुळे त्याने अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्यामुळे त्याच्या अचानक जाण्याने पिंपळी गावासह बारामती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button