स्थानिक

बारामती प्रशासकीय भवनातील लिफ्ट दीर्घकाळ बंद; ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांना मनस्ताप

विविध कामांसाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात

बारामती प्रशासकीय भवनातील लिफ्ट दीर्घकाळ बंद; ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांना मनस्ताप

विविध कामांसाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात

बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील प्रशासकीय भवनामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी बसविण्यात आलेली लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

विशेषतः वृद्ध, दिव्यांग तसेच महिलांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी वरच्या मजल्यांवर जाण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये नागरिकांसाठी विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासकीय भवनात नागरिकांना सुलभ सेवा मिळावी यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती.मात्र सध्या हीच सुविधा दुर्लक्षित झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

प्रशासकीय भवनात दररोज विविध कामांसाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, महसूल विभाग,तसेच इतर शासकीय कामांसाठी अनेकांना वरच्या मजल्यांवर जावे लागते. लिफ्ट बंद असल्यामुळे वृद्ध नागरिकांना जिने चढणे कठीण जात असून दिव्यांग व्यक्तींनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

नागरिकांच्या सुविधांसाठी उभारलेल्या यंत्रणा केवळ शोभेपुरत्याच आहेत का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, प्रशासकीय भवनातील लिफ्ट तातडीने दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी बारामतीकरांकडून करण्यात येत आहे.विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचा विचार करून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Back to top button