बारामतीत विकास हवा, पण झाडांच्या बळीवर नव्हे!
झाडे पडण्यामागील कारणांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी

बारामतीत विकास हवा, पण झाडांच्या बळीवर नव्हे!
झाडे पडण्यामागील कारणांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी
बारामती वार्तापत्र
शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे बारामतीच्या रूपात बदल होत असला, तरी पर्यावरणाच्या किंमतीवर होणारा विकास आता चर्चेचा विषय ठरत आहे.
इंदापूर रोडवरील प्रशासकीय भवनासमोर सुरू असलेल्या शुशोभीकरणाच्या कामामुळे येथील अनेक झाडे धोक्यात आली आहे.शुशोभीकरणाच्या कामादरम्यान झाडांच्या बुंध्यांभोवतीची माती काढण्यात आल्याने त्यांची मुळे उघडी पडली आणि जमिनीवरील पकड कमकुवत झाली.
त्यानंतर शुक्रवारी झालेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्याच्या तडाख्यात अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे विकासकामांच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या मते, विकासकामे करताना झाडे तोडणे किंवा त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणे योग्य नाही. उलट विद्यमान वृक्षांचे संरक्षण करूनच विकासाची दिशा ठरविणे गरजेचे आहे.
शहराचे सौंदर्य वाढविताना हिरवळ टिकविणे हीदेखील प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी हितसंबधामुळे याकडे दुर्लक्ष करत आहे. कोसळलेल्या झाडांमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. संबंधित यंत्रणांनी झाडे हटवून मार्ग मोकळा केला असला, तरी झाडे पडण्यामागील कारणांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून होत आहे.
बारामतीच्या विकासाची गती कायम राहावी, मात्र तो विकास पर्यावरणपूरक असावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. “विकास हवा, पण झाडांच्या बळीवर नव्हे,” हा सूर आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.






