स्थानिक

बारामती नगरपरिषद सर्वसाधारण सभेच्या लाईव्ह प्रक्षेपणाची मागणी

प्रशासनातील पारदर्शकता वाढण्यास मदत हो

बारामती नगरपरिषद सर्वसाधारण सभेच्या लाईव्ह प्रक्षेपणाची मागणी

प्रशासनातील पारदर्शकता वाढण्यास मदत हो

बारामती वार्तापत्र

बारामती नगरपरिषदेची १२ जून २०२६ रोजी होणारी सर्वसाधारण सभा नागरिकांना थेट पाहता यावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अॅड. सुधीर शरद पाटसकर यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन सभेचे यूट्यूब, फेसबुक अथवा नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीमिंग) करण्याची मागणी केली आहे.

मात्र यापूर्वीही बारामतीतील सिटी केबल सिस्टमचे संचालक सागर अरुण सस्ते यांनी गेल्या पंचवार्षिक मध्ये तसेच या वर्षी 19 जानेवारी 2026 रोजी दुसरे निवेदन पत्र नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे लाईव्ह चित्रीकरण करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती.

सार्वजनिक स्वरूपाच्या सभांचे चित्रीकरण आणि नागरिकांना माहिती उपलब्ध करून देणे हा लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मनसेचे याबाबत तिसरे निवेदन दिले आहे आता तरी नगरपरिषद प्रशासन व सदस्य निर्णय घेणार का हे पाहणे गरजेचे आहे.

मनसेच्या निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये शहर विकास, नागरी सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जातात.

मात्र या चर्चांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मर्यादित स्वरूपात पोहोचते. सभेचे थेट प्रक्षेपण झाल्यास नागरिकांना कोणते विषय मांडले जात आहेत, त्यावर कोणती चर्चा होत आहे आणि लोकप्रतिनिधींची भूमिका काय आहे, हे प्रत्यक्ष पाहता येईल.

यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढण्यास मदत होईल तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील उत्तरदायित्व अधिक दृढ होईल. नागरिकांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात सहभाग वाढविण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरू शकतो, असे निवेदनात नमूद केले आहे.

तर सिटी केबल सिस्टमच्या निवेदनात भारतीय संविधानाच्या कलम १९(१)(अ) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माहिती मिळविण्याचा अधिकार, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या काही निर्णयांचा संदर्भ देत सार्वजनिक स्वरूपाच्या शासकीय कामकाजातील पारदर्शकतेवर भर देण्यात आला होता तरी संबंधित निद्रेत असल्याचे सोंग घेत आहे. लाईव्ह सभा केली तर हेवेदावे समोर येऊन नाचक्की होईल अशी भीती असल्याची चर्चा आहे.

यावेळी अॅड. भार्गव पाटसकर, अॅड. निलेश वाबळे आणि प्रीतम तपकीर उपस्थित होते. लोकशाही मूल्ये, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने १२ जून रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

Back to top button