बारामती नगरपरिषदेत भीतीचे सावट; अटकेच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू
कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत.

बारामती नगरपरिषदेत भीतीचे सावट; अटकेच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू
कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात होत असलेल्या कथित बदनामी, तक्रारी आणि मानसिक त्रासाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
संबंधित प्रकरणातील तक्रारदार सोहेल शेख यांच्यावर तातडीने कारवाई करून अटक करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी एकवटल्याने नगरपरिषदेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
नगरपरिषदेच्या कर व प्रशासकीय विभागाशी संबंधित प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. अधिकारी सचिन खोरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या NCR नंतर कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला.
त्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केले. निवेदनात संबंधित तक्रारींमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांविरोधात सातत्याने तक्रारी करून तसेच समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक अधिकारी व कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत. याचा थेट परिणाम नगरपरिषदेच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. “अधिकाऱ्यांचा मानसिक छळ आणि बदनामी थांबली पाहिजे. प्रशासनात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
कामबंद आंदोलनामुळे नगरपरिषदेतील अनेक विभागांचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या विविध कामांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांच्यासमोर हा वाद सोडविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
या घडामोडींमुळे बारामतीतील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासन या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






