स्थानिक

बारामतीकरांना पाणीटंचाईचा फटका; उद्यापासून ‘दोन दिवसाआड’ पाणीपुरवठा

२३ जूनपासून शहरातील विविध भागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार

बारामतीकरांना पाणीटंचाईचा फटका; उद्यापासून ‘दोन दिवसाआड’ पाणीपुरवठा

२३ जूनपासून शहरातील विविध भागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार

बारामती वार्तापत्र 

यंदाच्या एल निनोच्या प्रभावामुळे राज्यभरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचे पडसाद आता बारामती शहरातही उमटू लागले आहेत. नीरा डावा कालव्यातील आवर्तन सध्या बंद असल्याने शहरासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या असून, बारामती नगरपरिषदेने शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

नगरपरिषदेने सोमवारी (२२ जून) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील अनेक भागांत अपुऱ्या पावसामुळे जलस्रोतांवरील ताण वाढला आहे. वाढते तापमान आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. बारामती शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेला नीरा डावा कालवा बंद असल्याने उपलब्ध पाणीसाठा मर्यादित राहिला आहे.

या पार्श्वभूमीवर मंगळवार, २३ जूनपासून शहरातील विविध भागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाटस रिंगरोड, सायली हिल आणि जळोची येथील जलशुद्धीकरण केंद्रांतून होणाऱ्या पुरवठ्याचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा साठा करून त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नीरा डावा कालव्यातील पाण्याचा प्रवाह पूर्ववत सुरू होईपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्याधिकारी पंकज भसे यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करताना, उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून शहरातील सर्व भागांना समतोल पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

उन्हाळ्याच्या तडाख्यानंतर पावसानेही अपेक्षित हजेरी न लावल्याने बारामतीकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयामुळे नागरिकांना पाण्याचे नियोजन अधिक काळजीपूर्वक करावे लागणार असून, अनेक भागांत या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. नगरपरिषदेने परिस्थिती सुधारताच नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

Back to top button