स्थानिक

पिण्याच्या पाण्याची बचत करत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श; नगरसेविका मनीषा चव्हाण यांची विहीर उद्यान विभागासाठी खुली

शहरातील हिरवाई जपण्यास मदत

पिण्याच्या पाण्याची बचत करत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श;
नगरसेविका मनीषा चव्हाण यांची विहीर उद्यान विभागासाठी खुली

शहरातील हिरवाई जपण्यास मदत

बारामती वार्तापत्र 

शहरात सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. अशा परिस्थितीत झाडांच्या संवर्धनासाठीही पर्यायी उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ च्या विद्यमान नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती सौ. मनीषा समीर चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या स्वमालकीची विहीर उद्यान विभागाला झाडांना पाणी देण्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे.

बारामती शहरातील विविध रस्ते, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांवरील झाडे टिकवून ठेवण्यासाठी नियमित पाणी देणे आवश्यक असते. मात्र सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत झाडांना पाणी देण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे योग्य ठरणार नाही. ही बाब लक्षात घेऊन मनीषा चव्हाण यांनी पुढाकार घेत उद्यान विभागाला त्यांच्या विहिरीतील पाणी वापरण्याची परवानगी दिली आहे.

या उपक्रमामुळे शहरातील हिरवाई जपण्यास मदत होणार असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर कोणताही अतिरिक्त ताण येणार नाही. पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारण यांचा समतोल साधणारा हा निर्णय सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत घेतलेल्या या निर्णयाबद्दल विविध स्तरांतून मनीषा चव्हाण यांचे कौतुक होत आहे. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देतानाच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही पार पाडण्याचा हा आदर्श प्रयत्न असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

“पिण्याच्या पाण्याची बचत आणि झाडांचे संवर्धन” या दुहेरी उद्दिष्टांची पूर्तता करणारा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.

Back to top button