बारामती धावणार ‘राष्ट्रीय ट्रॅकवर’ कटफळ गावाच्या माळरानावर ‘स्पोर्ट्स सिटी’
ऑलिम्पिक दर्जाचा स्वीमिंग पूल, सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान, आर्चरी रेंज आणि क्रिकेट अकादमीचा समावेश

बारामती धावणार ‘राष्ट्रीय ट्रॅकवर’
कटफळ गावाच्या माळरानावर ‘स्पोर्ट्स सिटी’
ऑलिम्पिक दर्जाचा स्वीमिंग पूल, सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान, आर्चरी रेंज आणि क्रिकेट अकादमीचा समावेश
बारामती वार्तापत्र
बारामती– शिक्षण, उद्योग, शेती आणि विकासाच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या बारामतीच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. बारामती मध्ये कटफळ गावाच्या माळरानावर अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. यामध्ये ऑलिम्पिक दर्जाचा स्वीमिंग पूल, सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान, आर्चरी रेंज आणि क्रिकेट अकादमीचा समावेश असणार आहे. या प्रकल्पामुळे बारामती पश्चिम महाराष्ट्रातील नव्हे तर राज्यातील महत्त्वाचे क्रीडा केंद्र बनणार आहे.
बारामती तालुक्यातील कटफळ गावाच्या माळरानावर २० हजार ७६७ चौरस मीटर क्षेत्रावर जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्यात येणार आहेत. क्रीडा संकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा बारामतीत आयोजित करण्याची क्षमता निर्माण होणार आहे. त्यामुळे क्रीडा पर्यटनाला चालना मिळेल.
ग्रामीण भागातील खेळाडूंना शहरांमध्ये जाऊन प्रशिक्षण घेण्याची गरज भासू नये, या उद्देशाने विविध खेळांसाठी एकाच ठिकाणी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून करण्यात आला आहे. बारामती, इंदापूर, दौंड, फलटण तसेच पुरंदर परिसरातील अनेक खेळाडूंमध्ये क्षमता असूनही आधुनिक सुविधांच्या अभावामुळे त्यांची प्रगती खुंटते.
कटफळ येथील क्रीडा संकुल पूर्ण झाल्यानंतर या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, स्पर्धा आणि तज्ज्ञ मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार आहे. यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविण्याचा मार्ग अधिक सुकर होणार असल्याचे क्रीडा क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
———
दृष्टिक्षेपात क्रीडा संकुल
धावपटू पासून जलतरणपटू पर्यंत सर्वांसाठी अत्याधुनिक सुविधा
Ø ४०० मीटरचा आठ लेनचा सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅक. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या निकषांनुसार तयार होणाऱ्या या ट्रॅकवर धावपटूंना दर्जेदार सरावाची संधी मिळणार आहे. यासोबतच लाँग जंपसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.
Ø फुटबॉलप्रेमींसाठी १०५.४ बाय ६८ मीटर आकाराचे नैसर्गिक गवतावरील मैदान तयार करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यास सक्षम असे हे मैदान बारामतीच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिणार आहे.
Ø ५० मीटर बाय २५ मीटरचा ऑलिम्पिक दर्जाचा स्वीमिंग पूल. याशिवाय डायव्हिंगसाठी स्वतंत्र पूल आणि नवशिक्यांसाठी लहान पूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जलतरण आणि डायव्हिंग या दोन्ही खेळांना चालना मिळणार आहे.
Ø २०० मीटर लांबीचे स्केटिंग रिंग,
Ø ७० मीटर लांबीचे आर्चरी रेंज मैदान
Ø पाच नेट्ससह क्रिकेट प्रॅक्टिस पिच उभारण्यात येणार आहेत. क्रिकेट, स्केटिंग आणि तिरंदाजी या खेळांमध्ये वाढत्या रुचीचा विचार करून या सुविधा नियोजित करण्यात आल्या आहेत.
———
बारामतीत क्रीडा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होत असल्याने बारामतीची ओळख ‘विकासाचे मॉडेल’ यापलीकडे जाऊन ‘स्पोर्ट्स हब’ म्हणून निर्माण होण्याची अपेक्षा दिसत आहेत. आजवर पुणे, मुंबई किंवा कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा आता बारामतीतच उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार आहे.—- अॅड. शहानुर शेख, बारामती क्रिकेट क्लब सदस्य
———-
कटफळ येथे अत्याधुनिक असे क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. ऑलिम्पिक दर्जाच्या सुविधा असणाऱ्या घटकांचा यामध्ये समावेश आहे. हा प्रकल्प दर्जेदार उभारण्यात येणार आहे. —- मधुकर सुर्वे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बारामती
————






