स्थानिक

संकटांपुढे हार मानू नका; परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद कमवा”बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विद्यार्थ्यांना संदेश

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’चा मंत्र देत सुधा मूर्तींचे प्रेरणादायी मार्गदर्शन

संकटांपुढे हार मानू नका; परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद कमवा”बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विद्यार्थ्यांना संदेश

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’चा मंत्र देत सुधा मूर्तींचे प्रेरणादायी मार्गदर्शन

बारामती वार्तापत्र 

जीवनात परिस्थिती कधीच कायमची नसते. सुख-दुःखाचे अनेक टप्पे येतात. मात्र कोणत्याही संकटापुढे हार मानू नका. प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याची क्षमता स्वतःमध्ये विकसित करा,” असा प्रेरणादायी संदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसेवेची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
बारामतीतील विद्यानगरी परिसरातील ग. दि. मा. सभागृहात ‘सीड्स ऑफ इन्सपायरेशन’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला राज्यसभेच्या खासदार तथा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित समाजसेविका सुधा मूर्ती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, नगराध्यक्ष सचिन सातव, विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त राजीव शहा, ॲड. निलीमा गुजर, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, “सुधा मूर्ती यांनी संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केले आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा, ऊर्जा आणि समाजासाठी जगण्याची दिशा मिळते. सतत शिकत राहणे आणि त्या ज्ञानाचा समाजहितासाठी उपयोग करणे हीच खरी प्रगती आहे.” बारामतीचा झालेला विकास पाहून सुधा मूर्ती भारावून गेल्या असून त्या पुन्हा बारामतीला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सुधा मूर्ती यांनी विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचा धडा दिला. “चांगल्या सवयी, शिस्त, वेळेचे नियोजन, कठोर परिश्रम आणि निर्णयक्षमता हे यशाचे खरे सूत्र आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विचाराने समाजाच्या उन्नतीसाठी काम केले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
मुलांवर स्वतःच्या अपेक्षा लादू नका, त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना फुलू द्या, असा मोलाचा सल्ला त्यांनी पालक आणि शिक्षकांना दिला. “फुलाची कळी जशी नैसर्गिकरित्या उमलते, तसेच मुलांचे व्यक्तिमत्त्व विकसित होऊ द्या,” असे त्या म्हणाल्या.
विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता संकटांशी धैर्याने सामना करावा, मातृभाषा, कुटुंब, शाळा, राज्य आणि देशावर प्रेम करावे तसेच आई-वडील, शिक्षक आणि ज्येष्ठांचा आदर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महिला आज शिक्षणाच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे काम करत असून बदलत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स आणि नवतंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रातही नावीन्यपूर्ण प्रयोगांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना सुनेत्रा पवार आणि सुधा मूर्ती यांनी दिलखुलास उत्तरे दिली. प्रेरणादायी विचारांनी भारावलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Back to top button