पोलिस उपनिरीक्षकावर शारीरिक अत्याचाराचा गुन्हा; पोलिस बॅण्ड कर्मचाऱ्यावरही सहकार्याचा आरोप ;ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली बारामती तालुका पोलिसांत गुन्हा
५ जुलै रोजी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

पोलिस उपनिरीक्षकावर शारीरिक अत्याचाराचा गुन्हा; पोलिस बॅण्ड कर्मचाऱ्यावरही सहकार्याचा आरोप;ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली बारामती तालुका पोलिसांत गुन्हा
५ जुलै रोजी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
बारामती वार्तापत्र
पोलिस भरतीत मदत करण्याचे आमिष दाखवून एका ३० वर्षीय विवाहितेवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप एका पोलिस उपनिरीक्षकावर करण्यात आला असून, या कथित प्रकारात मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस बॅण्डमधील एका कर्मचाऱ्याविरोधातही बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमरनाथ भीमराव कुंभार (मूळ रा. जंक्शन, ता. इंदापूर; सध्या बीईजी सेंटर, गंधमनगर, येरवडा, पुणे) तसेच नवी मुंबई पोलिस बॅण्डमधील कर्मचारी मारुती विष्णू करे (रा. झारगडवाडी, ता. बारामती) यांच्याविरुद्ध शारीरिक अत्याचार, विनयभंग आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (ॲट्रॉसिटी) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, बारामती एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहित महिलेसोबत हा प्रकार ११ नोव्हेंबर २०२५ रोजी घडला. याप्रकरणी ५ जुलै रोजी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रारीनुसार, फिर्यादी महिला बारामतीतील संभाजीनगर परिसरात बॅण्ड क्लाससाठी गेल्या असताना मारुती करे यांनी त्यांना, “अमरनाथ कुंभार तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत,” असे सांगून मोटारीजवळ नेले. फिर्यादीची इच्छा नसतानाही पोलिस भरतीत मदत करण्याचा दबाव निर्माण करून त्यांना मोटारीत बसविण्यात आल्याचा आरोप आहे.
त्यानंतर संबंधित महिलेला करे यांच्या सदनिकेत नेण्यात आले. तेथे थंड पेय घेऊन येतो, असे सांगून करे बाहेर गेल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार यांनी फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती करत तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बारामती तालुका पोलिसांकडून सुरू असून, तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.






