स्थानिक

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणीचे राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन

सुनेत्रा वहिनींच्या सूचनेनंतर हालचालींना वेग.

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणीचे राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन

सुनेत्रा वहिनींच्या सूचनेनंतर हालचालींना वेग.

बारामती वार्तापत्र 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरातून जाणाऱ्या पालखी महामार्गावरील अपूर्ण कामांचा प्रश्न राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा वहिनी पवार यांनी गांभीर्याने घेत संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या सूचनेनुसार आणि विशेष लक्षामुळे आज बारामती नगरपरिषदेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे निवेदन सादर करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

नगराध्यक्ष सचिन सातव आणि बांधकाम समितीचे सभापती अमर धुमाळ यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ओएसडी सचिन यादव, नगरसेवक अमोल कावळे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर कुलकर्णी, ज्युनिअर इंजिनिअर सलीम शेख तसेच रस्ता कामाचे कंत्राटदार प्रतिनिधी सचिन रायगुडे उपस्थित होते.

बारामती शहर हे संत तुकाराम महाराज, संत संतराज महाराज आणि संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे महत्त्वाचे मुक्कामस्थान आहे. दरवर्षी लाखो वारकरी या मार्गावरून प्रवास करत असतात. त्यामुळे पालखी मार्ग सुरक्षित, स्वच्छ आणि सुशोभित असणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी या कामांकडे विशेष लक्ष देत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

नगरपरिषदेने दिलेल्या निवेदनात फलटण रस्ता आणि पाटस रस्त्यावर स्ट्रीट लाईट उभारणे, दुभाजकांमध्ये फुलझाडे आणि वृक्षारोपण करणे, शहराच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर स्वागत कमानी उभारणे, तसेच पालखी मार्गाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय देशमुख चौक आणि गुलाबराव ढवण पाटील चौक येथील जंक्शनची सुधारणा व सुशोभीकरण, वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आणि अपूर्ण विकासकामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशमुख चौक आणि गुलाबराव ढवाण पाटील चौक परिसरात पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असल्याने तेथील अपूर्ण स्टॉर्म वॉटर लाईनची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

तसेच पालखी सोहळ्यापूर्वी मेडद हद्दी लगत च्या रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि वारकरी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी निवेदनातील मागण्यांची दखल घेत पालखी सोहळ्यापूर्वी प्राधान्याने आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे समजते.

उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरपरिषदेच्या पाठपुराव्यामुळे पालखी सोहळ्यापूर्वी महामार्गावरील प्रलंबित कामांना गती मिळणार असून लाखो वारकऱ्यांना अधिक सुरक्षित, सुकर आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Back to top button