निसर्गप्रेमाची बीजे रुजविणारा वनमहोत्सव; शहा ग्लोबल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश
पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी

निसर्गप्रेमाची बीजे रुजविणारा वनमहोत्सव; शहा ग्लोबल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश
पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी
इंदापूर आदित्य बोराटे –
पर्यावरण संरक्षणाची जाणीव बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी, या उद्देशाने शहा ग्लोबल स्कूलमध्ये वनमहोत्सवानिमित्त विविध पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात पार पडले. प्री-प्रायमरी व प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी इको-फ्रेंडली फॅन्सी ड्रेस, संदेशपर भाषणे आणि पर्यावरण संवर्धनाविषयीच्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.
इको-फ्रेंडली फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहकार्याने पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून झाडे, पृथ्वी, निसर्गमाता, पाणी संवर्धन, स्वच्छ पर्यावरण आणि फळझाडे अशा विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक वेशभूषा साकारली. विद्यार्थ्यांनी ‘रिड्यूस, रीयूज, रिसायकल (3Rs)’, पाणी बचत, वृक्षारोपण आणि पृथ्वीच्या संवर्धनाचा प्रभावी संदेश आत्मविश्वासाने मांडला.

स्पर्धेत ग्रेड १ व २ गटात मीरा सागर शिंदे हिने प्रथम, हिंदवी प्रशांत उंबरे हिने द्वितीय, तर ऋत्विज विजय लोंढे याने तृतीय क्रमांक पटकाविला. ग्रेड ३, ४ व ५ गटात आरव दादा गार्डे प्रथम, स्वराली संतोष शेंडे द्वितीय आणि राजवर्धन नवीनकुमार सावंत तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
या कार्यक्रमास शाळेच्या व्यवस्थापन सदस्या रुचिरा शहा उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांचे सादरीकरण, पालकांचा सर्जनशील सहभाग आणि शिक्षकांच्या नियोजनाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा बुरळे यांनी केले. प्राचार्या वैष्णवी देशपांडे यांनी पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत वृक्षारोपण, पाणी बचत, प्लास्टिकचा कमी वापर आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
वनमहोत्सवानिमित्त झालेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून अनुभवता आले. निसर्गप्रेमाची बीजे बालमनात रुजविण्याचा शाळेचा हा उपक्रम उपस्थितांच्या पसंतीस उतरला.






