बारामतीच्या लेकीची देशात झेप;श्रावणी कृष्णा कुदळे हिने ७२० पैकी तब्बल ७१० गुण
ऑल इंडिया रँक (एआयआर) ५ क्रमांक पटकावला आहे.

बारामतीच्या लेकीची देशात झेप;श्रावणी कृष्णा कुदळे हिने ७२० पैकी तब्बल ७१० गुण
ऑल इंडिया रँक (एआयआर) ५ क्रमांक पटकावला आहे.
बारामती वार्तापत्र
देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि स्पर्धात्मक वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीट (युजी) २०२६ मध्ये बारामतीच्या कन्येने ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण राज्याची मान उंचावली आहे. श्रावणी कृष्णा कुदळे हिने ७२० पैकी तब्बल ७१० गुण मिळवत ऑल इंडिया रँक (एआयआर) ५ क्रमांक पटकावला आहे.
एवढेच नव्हे, तर देशातील सर्व मुलींमध्ये प्रथम क्रमांक, ओबीसी (एनसीएल) प्रवर्गात ऑल इंडिया रँक-१ आणि महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवत तिने यशाचा नवा उच्चांक गाठला आहे.
श्रावणीच्या या दैदिप्यमान यशामुळे बारामती मध्ये आनंदाचे वातावरण असून शिक्षण क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, तिचे आई-वडील दोघेही पुणे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षक दांपत्याच्या घरातील मुलीने देशपातळीवर मिळवलेले हे यश शासकीय शिक्षण व्यवस्थेसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.श्रावणीने ९९.९९ टक्के मिळवले आहे. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमधून अव्वल पाचमध्ये स्थान मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जाते.
श्रावणीच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे काटेकोर नियोजन, पालकांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे मोलाचे सहकार्य असल्याचे सांगितले जात आहे. शिक्षक असलेल्या आई-वडिलांनी शिक्षणाचे महत्त्व लहानपणापासूनच तिच्या मनावर बिंबवले. त्याच संस्कारांच्या बळावर श्रावणीने वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवण्याच्या स्वप्नाला यशाचे पंख दिले.
राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी श्रावणीचे यश प्रेरणादायी ठरले असून, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरही सर्वोच्च यश मिळवता येते, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.






