गोविंद बागेत वारीचा भक्तिरंग; संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे बारामतीत पहिल्यांदाच ज्येष्ठ नेते शरद पवार घेतले दर्शन
‘राम कृष्ण हरी… राम कृष्ण हरी…’ चा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय

गोविंद बागेत वारीचा भक्तिरंग; संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे बारामतीत पहिल्यांदाच ज्येष्ठ नेते शरद पवार घेतले दर्शन
‘राम कृष्ण हरी… राम कृष्ण हरी…’ चा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय
बारामती वार्तापत्र
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) हद्दीतून मार्गस्थ झालेल्या संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याने परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. गोविंद बाग येथे पालखीचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि प्रतिभा (काकी) पवार यांनी उपस्थित राहून संतांच्या पालखीला विनम्र अभिवादन केले. धार्मिक परंपरेशी असलेली आपली नाळ कायम असल्याचा संदेश त्यांच्या उपस्थितीतून पुन्हा अधोरेखित झाल्याची चर्चा वारकरी आणि राजकीय वर्तुळात रंगली.
यावेळी वारकऱ्यांच्या मुखातून अखंड घुमणारा ‘राम कृष्ण हरी… राम कृष्ण हरी…’ चा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. पालखीचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक नागरिकांसह हजारो वारकरी गोविंद बाग परिसरात दाखल झाले होते. शरद पवार यांनीही वारकरी परंपरेप्रती आदर व्यक्त करत पालखीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांशी संवाद साधला.
बारामतीच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात वारकरी संप्रदायाला विशेष स्थान असून, आषाढी वारीच्या निमित्ताने सर्वच राजकीय नेते पालखीचे दर्शन घेत असल्याची परंपरा आहे. त्यात शरद पवार यांच्या उपस्थितीने यंदाच्या सोहळ्याला विशेष राजकीय रंग चढल्याची चर्चा परिसरात होती.
पालखी सोहळ्यादरम्यान पोलिस प्रशासनाने वाहतूक आणि गर्दीचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले. निरा-बारामती राज्य मार्गावर पालखी रथाचा प्रवास सुरळीत पार पडावा तसेच इतर वाहनांची वाहतूकही विनाअडथळा सुरू राहावी, यासाठी पोलिस अधिकारी कुलदीप संकपाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दक्षता घेतली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता पालखी सोहळा शांततापूर्ण वातावरणात पार पडला.
संत सोपानकाका महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि जलसेवेची व्यवस्था करण्यात आली होती. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात माळेगाव परिसराने वारीच्या परंपरेचा अविस्मरणीय सोहळा अनुभवला. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक सलोखा यांची सांगड घालणाऱ्या या सोहळ्यात शरद पवार यांच्या उपस्थितीने भक्तीबरोबरच राजकीय चर्चांनाही उधाण आले.






