विश्वासघाताचा शेवट तुरुंगात! बारामतीतील वकिलाला फसवणुकीप्रकरणी शिक्षा
पक्षकाराचा विश्वास तोडणाऱ्या वकिलाला न्यायालयाची कठोर शिक्षा

विश्वासघाताचा शेवट तुरुंगात! बारामतीतील वकिलाला फसवणुकीप्रकरणी शिक्षा
पक्षकाराचा विश्वास तोडणाऱ्या वकिलाला न्यायालयाची कठोर शिक्षा
बारामती वार्तापत्र
पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर मिळालेल्या नुकसानभरपाईची रक्कम सुरक्षितपणे मिळवून देण्याचे आश्वासन देत पक्षकाराचा विश्वास संपादन करून तब्बल ₹१० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती न्यायालयाने आरोपी वकील अॅड. बापू बाबुराव दिवेकर यांना भारतीय दंड संहिता कलम ४२० अंतर्गत दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी आणि ₹२५ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.
बारामतीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टी. डी. इंगवले यांनी ३१ जुलै रोजी हा निकाल दिला. दंड न भरल्यास आरोपीला आणखी तीन महिने साधी कैद भोगावी लागणार असून, दंडाच्या रकमेतून ₹२० हजार फिर्यादीच्या कायदेशीर वारसांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
प्रकरणातील फिर्यादी बाळासाहेब दत्तात्रय रणसिंग यांच्या पत्नीचा २०१५ मध्ये मोटार अपघातात मृत्यू झाला होता. नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यासाठी त्यांनी अॅड. दिवेकर यांच्याकडे वकीलपत्र दिले होते. दावा मंजूर झाल्यानंतर नुकसानभरपाईची रक्कम फिर्यादी व त्यांच्या मुलांच्या संयुक्त बँक खात्यात जमा करण्यात आली.
अभियोग पक्षाच्या म्हणण्यानुसार, वकील फी म्हणून केवळ ₹१ लाख काढण्यासाठी धनादेश व बँकेच्या कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या. मात्र, त्या कागदपत्रांचा गैरवापर करून आरोपीच्या वैयक्तिक खात्यावर ₹१० लाख वर्ग करण्यात आले. बँकेच्या प्रमाणित नोंदी आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे हा व्यवहार न्यायालयात सिद्ध झाला.
या प्रकरणात एकूण ₹१६.१९ लाखांच्या व्यवहारांबाबत आरोप करण्यात आले होते. मात्र सर्व व्यवहारांचा लाभ आरोपीलाच झाला, हे पुराव्याअभावी सिद्ध न झाल्याने त्या भागात न्यायालयाने दोष सिद्ध मानला नाही. तथापि, आरोपीच्या खात्यावर वर्ग झालेल्या ₹१० लाखांच्या व्यवहाराबाबत फसवणूक संशयापलीकडे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, आरोपीने नुकसानभरपाईच्या ५० टक्के रक्कम फी म्हणून घेण्याचा करार झाल्याचा दावा केला होता. मात्र त्यासंदर्भातील कोणताही लेखी करार, पावती किंवा विश्वासार्ह दस्तऐवज सादर करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने हा बचाव फेटाळून लावला.
निकालात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत म्हटले की, वकील आणि पक्षकार यांच्यातील विश्वासाचे नाते अत्यंत महत्त्वाचे असते. त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन आर्थिक लाभ मिळविणे हा केवळ खासगी आर्थिक वाद नसून व्यावसायिक विश्वासभंगातून केलेला गंभीर आर्थिक गुन्हा आहे. अशा कृत्यामुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होऊ शकतो.
दरम्यान, या प्रकरणातील फिर्यादी बाळासाहेब रणसिंग यांचे मार्च २०२६ मध्ये निधन झाले. त्यामुळे अंतिम निकाल ते ऐकू शकले नाहीत. मात्र त्यांच्या तक्रारीतील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि बँकेचे दस्तऐवजी पुरावे यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावत पीडित कुटुंबाला दिलासा दिला.
या गुन्ह्याचा तपास बारामती शहर पोलिसांनी केला होता.
न्यायालयीन सुनावणीत सरकारी वकील ए. ए. रणसिंग, राहुल सोनवणे आणि होळकुंदे यांनी शासनाची बाजू प्रभावीपणे मांडली. तसेच महिला पोलीस शिपाई सगुणा आवटे यांनी साक्षीदारांचा पाठपुरावा आणि न्यायालयीन समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.







