स्थानिक

भरधाव हायवाचा दुचाकीला धडक बारामतीतील भिगवण रोडवरील भीषण अपघात; जखमीला १०० फूट फरफटल्याचा आरोप

जखमीला फरफटत नेल्याचा आरोप

भरधाव हायवाचा दुचाकीला धडक बारामतीतील
भिगवण रोडवरील भीषण अपघात; जखमीला १०० फूट फरफटल्याचा आरोप

जखमीला फरफटत नेल्याचा आरोप

बारामती वार्तापत्र 

बारामती-भिगवण रोडवरील बारामती सहकारी बँकेसमोर मंगळवारी सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या हायवा ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला जोरदार धडक दिल्याने वसीम इनामदार (रा. पतंगशाहनगर, बारामती) हे गंभीर जखमी झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडकेनंतर हायवा चालकाने वाहन न थांबवता जखमीला सुमारे १०० फूटांपर्यंत फरफटत नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बारामती सहकारी बँकेचे कर्मचारी महेश बारवकर यांनी तातडीने धाव घेत जखमीला फैय्याज शेख यांनी स्वतःच्या रिक्षातून स्वामी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डब्ल्यू बी-71-बी -4912 क्रमांकाच्या हायवा ट्रकचा अपघातात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. जखमीला फरफटत नेल्याचा आरोप आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत शहर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि शहर पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला. आरोपी चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

भिगवण रोडवर भरधाव अवजड वाहनांमुळे सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या मार्गावर वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी, अवजड वाहनांवर नियंत्रण आणि वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती वाढवण्याची मागणी होत आहे.

या भीषण अपघातामुळे वर्षभरापूर्वी याच परिसरात घडलेल्या आचार्य कुटुंबाच्या दुर्दैवी अपघाताच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून, “आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल बारामतीकर उपस्थित करत आहेत.

Back to top button