FSSAI चा मोठा दणका! बारामतीत तयार होणाऱ्या McDowell’s No.1 Rum च्या विक्रीवर बंदी; ‘हे’ आहे नेमकं कारण
FSSAI च्या तपासणीत नियमभंग उघड

FSSAI चा मोठा दणका! बारामतीत तयार होणाऱ्या McDowell’s No.1 Rum च्या विक्रीवर बंदी; ‘हे’ आहे नेमकं कारण
FSSAI च्या तपासणीत नियमभंग उघड
बारामती वार्तापत्र
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात निकष पूर्ण न झाल्याचे आढळल्यानंतर देशातील विविध उत्पादन प्रकल्पांमध्ये तयार होणाऱ्या काही मद्य ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या कारवाईमध्ये बारामतीतील मेसर्स युनायटेड स्पिरिट्स येथे तयार होणाऱ्या McDowell’s No.1 Rum चा समावेश आहे.
FSSAI ने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित उत्पादनांमध्ये परवानगी नसलेल्या फ्लेवर्सचा वापर करण्यात आल्याचे तसेच उत्पादन प्रक्रिया, परिपक्वता (Maturation) आणि साठवणुकीच्या कालावधीबाबत दिशाभूल करणारे दावे करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधित ब्रँड्सच्या विक्रीवर कारवाई करण्यात आली आहे.
बंदी घालण्यात आलेल्या प्रमुख उत्पादनांमध्ये…
- मेसर्स युनायटेड स्पिरिट्स, बारामती – McDowell’s No.1 Rum
- मेसर्स मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर, खोपोली – Old Monk The Legend, Gold Reserve, XXX Matured Rum
- मेसर्स Inbrew Beverages, मध्य प्रदेश – Bagpiper Deluxe Whisky, Old Cask Deluxe XXX Rum
- मेसर्स Associated Alcohol & Breweries, मध्य प्रदेश – Central Province Whisky, McDowell’s No.1 Celebration Matured XXX Rum
- मेसर्स United Spirits, मध्य प्रदेश – Antiquity Blue Whisky, Royal Challenge Whisky
याशिवाय, गोव्यातील Mandexi Distilleries & Breweries येथे FSSAI ने तपासणी करून नमुने गोळा केले असून महाराष्ट्रातील आणखी सहा उत्पादकांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.
ग्राहकांनी घाबरण्याचे कारण आहे का?
FSSAI ने स्पष्ट केले आहे की, सर्व मद्य उत्पादक नियमांचे उल्लंघन करत नाहीत. अनेक उत्पादक निर्धारित मानकांचे पालन करून उत्पादन करतात. मात्र, काही उत्पादक न्यूट्रल अल्कोहोल किंवा एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल वापरून कृत्रिम किंवा एकसारखे फ्लेवर्स मिसळून रम किंवा व्हिस्कीसारखी चव व सुगंध निर्माण करतात, जे मान्यताप्राप्त उत्पादन पद्धतींमध्ये बसत नाही.
तसेच, रममध्ये कृत्रिम रम फ्लेवर किंवा व्हिस्कीमध्ये व्हिस्की फ्लेवर मिसळून त्यांना पारंपरिक मद्यपेयांप्रमाणे सादर करण्याची कोणतीही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त उत्पादन पद्धत नसल्याचे FSSAI ने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
FSSAI च्या या कारवाईमुळे मद्य उत्पादन क्षेत्रात गुणवत्ता, पारदर्शकता आणि अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.






