बारामतीत रविवारी क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्तंभाला अभिवादन
स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

बारामतीत रविवारी क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्तंभाला अभिवादन
स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
बारामती वार्तापत्र
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक ‘चले जाव’ आंदोलनाच्या स्मृती जागवण्यासाठी बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ११ वाजता बारामती शहरातील हुतात्मा स्तंभ, वंदे मातरम् चौक (भिगवण चौक) येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात ‘भारत छोडो’ आंदोलनाची घोषणा करत *’करा किंवा मरा’*चा संदेश दिला होता. या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मरणार्थ देशभर ९ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून पाळला जातो.
या पार्श्वभूमीवर देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमास युवक-युवती, विद्यार्थी, व्यापारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच सर्व नागरिकांनी राष्ट्रीय पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निलेशभाई कोठारी यांनी केले आहे.
कार्यक्रमाची माहिती
📍 स्थळ: हुतात्मा स्तंभ, वंदे मातरम् चौक (भिगवण चौक), बारामती
🗓️ दिनांक: रविवार, ९ ऑगस्ट २०२६
🕚 वेळ: सकाळी ११.०० वाजता






