आईच्या दुधाचे महत्त्व अधोरेखित; बारामतीत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम
'पहिले सहा महिने फक्त आईचे दूध'— बारामतीत तज्ज्ञांकडून मातांना मार्गदर्शन

आईच्या दुधाचे महत्त्व अधोरेखित; बारामतीत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम
‘पहिले सहा महिने फक्त आईचे दूध’— बारामतीत तज्ज्ञांकडून मातांना मार्गदर्शन
बारामती वार्तापत्र
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महिला रुग्णालयाच्या सहकार्याने जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रम उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिन दगडे, पॅथॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. लीना नखाते, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. समीर पवार, महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भोई, मॅट्रन सीमा माने तसेच बालरोग विभागाच्या सिस्टर इंचार्ज रजिता उपस्थित होत्या.
कार्यक्रमात माता व नवजात शिशूच्या आरोग्यासाठी स्तनपानाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यात आले. जन्मानंतरच्या पहिल्या तासात स्तनपान सुरू करणे, जन्मापासून पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध देणे आणि त्यानंतर पूरक आहारासह दोन वर्षे किंवा त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवण्याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
यावेळी गर्भवती माता, प्रसूत माता आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्तनपानाचे आरोग्यदायी फायदे, योग्य स्तनपानाची पद्धत, आईच्या दुधामुळे नवजात बालकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास होणारी मदत तसेच बालकांच्या शारीरिक व बौद्धिक विकासातील स्तनपानाचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.






