मयुरेश्वराची आरती अन् आयुर्वेदिक कॉलेजची पाहणी; विकासकामांबाबत सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये
पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश

मयुरेश्वराची आरती अन् आयुर्वेदिक कॉलेजची पाहणी; विकासकामांबाबत सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये
पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश
बारामती वार्तापत्र
श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिराचे पुरातन व धार्मिक महत्त्व जपत प्राचीन वास्तूचे मूळ स्वरूप अबाधित ठेवावे. त्याचबरोबर आधुनिक सुविधांचा योग्य समन्वय साधून मंदिर परिसरातील विकास व जीर्णोद्धाराची कामे मंजूर आराखड्यानुसार दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिर परिसर तसेच मेडद येथील स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेतला.
मंदिर परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य
मयुरेश्वर मंदिर परिसरातील विकासकामांची पाहणी करताना सुनेत्रा पवार यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराची कामे मंजूर आराखड्यानुसारच करण्याच्या सूचना दिल्या. मंदिर परिसर तसेच गाभाऱ्यातील स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विकासकामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सातत्याने समन्वय ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई
विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा सुनेत्रा पवार यांनी दिला. कामांमध्ये हलगर्जीपणा किंवा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी. निकृष्ट अथवा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांची नावे काळ्या यादीत टाकण्यात येतील, अशी स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
मेडद आयुर्वेदिक महाविद्यालयाचीही पाहणी
यानंतर सुनेत्रा पवार यांनी मेडद येथील स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली. महाविद्यालय परिसरातील रस्ते विकसित करण्यासाठी आवश्यक हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच निवासाच्या सुविधांचा विचार करून महाविद्यालय आणि वसतिगृह पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालय, वसतिगृह आणि परिसरातील विविध सुविधांची पाहणी करून कामांची सद्यस्थिती जाणून घेतली.
तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पंचायत समिती सभापती किरण तावरे, जिल्हा परिषद सदस्या रोहणी कदम (ढोले), नगराध्यक्ष सचिन सातव, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किरण माने, मुख्याधिकारी पंकज भुसे, स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल काळे, मोरगाव देवस्थानचे विश्वस्त देवराज डहाळे आदी उपस्थित होते.






