स्थानिक

बारामतीत सजली घोड्यांची बाजारपेठ; पहिल्याच दिवशी २५ घोडे दाखल

शेतकरी, पशुपालक अन् व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र बाजारपेठ

बारामतीत सजली घोड्यांची बाजारपेठ; पहिल्याच दिवशी २५ घोडे दाखल

शेतकरी, पशुपालक अन् व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र बाजारपेठ

बारामती वार्तापत्र 

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची येथील जनावरे बाजारात आता घोड्यांची खरेदी-विक्रीही होणार आहे. घोडेबाजाराचा नव्याने शुभारंभ करण्यात आला असून पहिल्याच दिवशी तब्बल २५ घोडे बाजारात दाखल झाले. या उपक्रमामुळे बारामतीच्या व्यापार-वाणिज्य क्षेत्राला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.
जळोची येथील जनावरे बाजारात घोड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध झाल्याने घोडेमालक, व्यापारी आणि ग्राहकांची मोठी सोय झाली आहे.

बारामतीसह परिसरात घोड्यांच्या खरेदी-विक्रीला मागणी असतानाही त्यासाठी स्वतंत्र आणि नियोजित बाजारपेठ उपलब्ध नव्हती. ही गरज लक्षात घेऊन बाजार समितीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

घोडेबाजाराच्या निमित्ताने जळोची परिसरातील विविध पूरक व्यवसायांनाही चालना मिळण्याची शक्यता आहे. घोड्यांची वाहतूक, चारा, खाद्यपदार्थ, देखभाल तसेच इतर सेवा-व्यवसायांमध्ये आर्थिक उलाढाल वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे घोडेबाजार हा केवळ खरेदी-विक्रीपुरता मर्यादित न राहता स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
—–
बाजार समितीचे सभापती विनायक गावडे म्हणाले, जळोची येथील जनावरे बाजारात घोडेबाजार सुरू झाल्याने बारामतीच्या विकासात निश्चितच भर पडणार आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील.
घोडेबाजार सुरू झाल्याने जळोची येथील जनावरे बाजाराच्या विस्ताराला नवी दिशा मिळाली असून, बारामतीच्या बाजारपेठेच्या नकाशावर जळोचीला आणखी एक नवी ओळख निर्माण झाली आहे.

—-

Back to top button