बारामती नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार कधी? १३ ऑगस्टपूर्वी गणवेश देण्याची मागणी
गणवेश न दिल्यास पालक, विद्यार्थी व नागरिकांच्या वतीने आंदोलनाचा इशारा

बारामती नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार कधी? १३ ऑगस्टपूर्वी गणवेश देण्याची मागणी
गणवेश न दिल्यास पालक, विद्यार्थी व नागरिकांच्या वतीने आंदोलनाचा इशारा
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होऊन बराच कालावधी लोटला असतानाही अद्याप शालेय गणवेश उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याचा मुद्दा पुढे आला आहे. याबाबत नगरसेविका तथा विरोधी पक्षनेत्या सौ. आरती मारुती शेंडगे (गव्हाळे) यांनी बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देत विद्यार्थ्यांना तातडीने दर्जेदार गणवेश उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
१२ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या पत्रात नगरपरिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्याप शालेय गणवेश उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन बराच कालावधी उलटला असूनही गणवेश न मिळणे ही गंभीर बाब असल्याचे पत्रात म्हटले आहे.
यापूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाची गुणवत्ता चांगली होती. त्याचप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे, टिकाऊ व गुणवत्तापूर्ण कपड्याचे गणवेश उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. केवळ गणवेश देण्याची पूर्तता न करता त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कापडाची गुणवत्ता तसेच शिलाईबाबतही योग्य ती दक्षता घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गणवेशामध्ये सहभागी होता यावे, यासाठी १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून द्यावेत, अशी स्पष्ट मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
दरम्यान, १३ ऑगस्टपर्यंत गणवेश उपलब्ध करून देण्यात आला नाही, तर १५ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना गणवेशाशिवाय स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची वेळ येऊ शकते. या प्रशासकीय दिरंगाईच्या निषेधार्थ पालक, विद्यार्थी व नागरिकांच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या हिताचा व स्वाभिमानाचा विचार करून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी आणि १३ ऑगस्टपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या गुणवत्तेचे शालेय गणवेश उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी सौ. आरती शेंडगे गव्हाळे यांनी केली आहे.







