स्थानिक

बारामतीत साडेतीनशे फूट तिरंगा हातात घेऊन भव्य तिरंगा रॅली

स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजप आणि भारतीय विद्यार्थी संघटनेचा उपक्रम; राष्ट्रप्रेमी नागरिकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बारामतीत साडेतीनशे फूट तिरंगा हातात घेऊन भव्य तिरंगा रॅली

स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजप आणि भारतीय विद्यार्थी संघटनेचा उपक्रम; राष्ट्रप्रेमी नागरिकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बारामती वार्तापत्र 

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात भाजप आणि भारतीय विद्यार्थी संघटनेच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. तब्बल साडेतीनशे फूट लांबीचा तिरंगा हातात घेऊन शहरातील प्रमुख बाजारपेठांमधून ही रॅली काढण्यात आली.

बारामतीतील तिरंगा चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर आहिल्यादेवी चौक, गुणवडी चौक, मारवड पेठ मार्गे पुन्हा तिरंगा चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

या रॅलीमध्ये राष्ट्रप्रेमी नागरिक, विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत सहभागी झालेल्या नागरिकांमुळे बारामती शहरातील वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून गेले होते.

विशाल तिरंगा हातात घेऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करताना नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह व्यक्त केला. रॅलीदरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग हे या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले. तरुणाईमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासोबतच राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याप्रती आदराचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य तिरंगा रॅलीमुळे बारामती शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

Back to top button