स्थानिक

अजितदादांचे ‘झोपडपट्टीमुक्त बारामती’चे स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठे पाऊल; आवास योजनेत बारामती अव्वल

३९५ घरकुलांना मंजुरी, आतापर्यंत ३८८ लाखांचे अनुदान वितरित

अजितदादांचे ‘झोपडपट्टीमुक्त बारामती’चे स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठे पाऊल; आवास योजनेत बारामती अव्वल

३९५ घरकुलांना मंजुरी, आतापर्यंत ३८८ लाखांचे अनुदान वितरित

बारामती वार्तापत्र 

‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०च्या अंमलबजावणीत बारामती नगरपरिषदेने पुणे विभागात अव्वल स्थान मिळवले आहे. नगरपरिषद हद्दीत आतापर्यंत तब्बल ३९५ घरकुलांना मंजुरी मिळाली असून, पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी टप्प्याटप्प्याने अनुदान वितरित करण्यात येत आहे.

पुणे विभागातील नगरपरिषदांच्या तुलनेत बारामती नगरपरिषदेकडून सर्वाधिक घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०च्या प्रभावी अंमलबजावणीत बारामती नगरपरिषद आघाडीवर ठरली आहे.

गृहनिर्माण विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी आवश्यक त्या टप्प्यांनुसार अनुदान देण्यात येते.

प्रत्येक घरकुलासाठी २.५० लाखांचे अनुदान

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत प्रत्येक घरकुलासाठी २.५० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान अनुज्ञेय आहे. यामध्ये केंद्र शासनाचा १.५० लाख रुपये, तर राज्य शासनाचा १ लाख रुपये हिस्सा आहे.

बारामती नगरपरिषदेकडून प्रत्यक्ष बांधकाम सुरू असलेल्या मंजूर घरकुलांच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण ३८८ लाख रुपयांचे अनुदान ऑनलाइन स्नॅप पोर्टलद्वारे वितरित करण्यात आले आहे.

यामध्ये २०८ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यापोटी, तर १८० लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यापोटी प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात आले आहेत. प्रत्येक हप्त्यामध्ये केंद्र शासनाचा ६० हजार आणि राज्य शासनाचा ४० हजार रुपयांचा हिस्सा आहे.

याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणखी २८ घरकुलांचा प्रस्ताव २८ जुलै २०२६ रोजी शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

रमाई आवास योजनेलाही गती

बारामती नगरपरिषदेकडून रमाई आवास योजना (शहरी) अंतर्गत सन २०२५-२६ साठी २४ लाभार्थी मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी १२ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यापोटी प्रत्येकी १ लाख रुपये, असे एकूण १२ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच ६ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यापोटी प्रत्येकी १ लाख रुपये, असे ६ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

अजित पवारांचे ‘झोपडपट्टीमुक्त बारामती’चे स्वप्न

बारामती शहरातील प्रत्येक गरजू नागरिकाला स्वतःचे पक्के घर मिळावे आणि बारामती शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे, हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होते. हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी बारामती नगरपरिषदेकडून विविध घरकुल योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे.

नगराध्यक्ष सचिन सातव म्हणाले, “बारामती शहरातील प्रत्येक गरजू कुटुंबाला स्वतःचे पक्के घर मिळावे आणि शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे, हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बारामती नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. पुणे विभागात बारामती नगरपरिषद अव्वल ठरली असून, ही कामगिरी नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रेरणादायी आहे.”

लाभार्थ्यांना वेळेत अनुदान देण्यासाठी पाठपुरावा

मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी सांगितले की, “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड, प्रस्ताव सादरीकरण, मंजुरी आणि अनुदान वितरणाची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. मंजूर घरकुलांचे बांधकाम प्रत्यक्ष सुरू होऊन लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळावे, यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.”

बारामती नगरपरिषदेच्या या कामगिरीमुळे शहरातील गरजू कुटुंबांना स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा आधार मिळत असून, आगामी काळात आणखी पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Back to top button