१५ ऑगस्ट उजाडला, तरी गणवेश नाही!; बारामती नगरपालिका प्रशासनाविरोधात निषेध आंदोलन
१२ ऑगस्टचे आश्वासन हवेतच!

१५ ऑगस्ट उजाडला, तरी गणवेश नाही!; बारामती नगरपालिका प्रशासनाविरोधात निषेध आंदोलन
१२ ऑगस्टचे आश्वासन हवेतच!
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही अद्याप गणवेश मिळालेला नसल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गणवेश वाटपाबाबत १२ ऑगस्ट रोजी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, १५ ऑगस्टपर्यंतही विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध न झाल्याने या दिरंगाईचा निषेध करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच अद्याप शालेय गणवेश मिळालेला नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
गणवेश वाटपाला झालेल्या विलंबाची जबाबदारी निश्चित करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. तसेच भविष्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याच्या वाटपात अशा प्रकारची दिरंगाई होऊ नये, यासाठी संबंधितांकडून लेखी हमी घेण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
नगरपालिका शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गणवेश, ड्रेस तसेच दप्तर वेळेत उपलब्ध करून देण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक साहित्याचे नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत वाटप करावे, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, १२ ऑगस्ट रोजी दिलेल्या आश्वासनानंतरही १५ ऑगस्टपर्यंत गणवेश न मिळाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन गणवेश वाटपाची प्रक्रिया पूर्ण करावी; अन्यथा निषेध आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.






