स्थानिक

शक्तिपीठ महामार्गावरून सुप्रिया सुळे आक्रमक; “आधी आहे ते रस्ते दुरुस्त करा, मग नवीन रस्ते बांधा!”

“कामे पूर्ण करणाऱ्यांना निधी नाही, मग हजारो कोटींचा खर्च कशासाठी?”

शक्तिपीठ महामार्गावरून सुप्रिया सुळे आक्रमक; “आधी आहे ते रस्ते दुरुस्त करा, मग नवीन रस्ते बांधा!”

“कामे पूर्ण करणाऱ्यांना निधी नाही, मग हजारो कोटींचा खर्च कशासाठी?”

बारामती वार्तापत्र 

शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील अनेक भागांतून प्रचंड विरोध होत असून, सरकारने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन चर्चा करावी, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना शक्तिपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यापेक्षा राज्यातील सध्याचे रस्ते दुरुस्त करण्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

शक्तिपीठ महामार्गावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचा उल्लेख करत सुळे म्हणाल्या की, “महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे. सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने निर्णय घ्यावा. शक्तिपीठ करत असताना महाराष्ट्रातील सर्व रस्त्यांची काय परिस्थिती आहे, हे मी सांगायला नको.”

राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. “रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. आहे ते रस्ते आधी दुरुस्त करा, पुढे कशाला नवीन नवीन रस्ते बांधता?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुलांनी पाठवलेल्या रस्त्यांच्या व्हिडिओंचा उल्लेख

राज्यातील लहान मुले तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांची दुरवस्था समोर आणत असल्याबद्दल सुळे यांनी त्यांचे आभार मानले. खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याचे सांगत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या प्रश्नावर आंदोलने सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ठेकेदारांच्या आंदोलनावरही सरकारवर निशाणा

मुंबईत सुरू असलेल्या ठेकेदारांच्या आंदोलनाचा संदर्भ देत सुळे यांनी हा विषय गंभीर असल्याचे सांगितले. “एकीकडे शक्तिपीठला हजारो कोटींचा खर्च करत आहात आणि ज्यांनी कामे पूर्ण केली आहेत, ते मेरिटवर आहेत, त्यांना निधी देत नाही. त्यांच्यासाठी या सरकारकडे निधी नाही,” अशी टीका त्यांनी केली.

सरकारचे आर्थिक धोरण नेमके कोणत्या दिशेने चालले आहे, असा सवाल उपस्थित करत ही परिस्थिती चिंताजनक असल्याचेही त्यांनी म्हटले.

शाळांमध्ये शूटिंगच्या जीआरवरून सरकारला सुनावले

अभिजीत दिपके यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने शाळांमध्ये शूटिंग करण्यास मज्जाव करणारा जीआर काढल्याचा दावा करत सुळे यांनी या निर्णयाचा निषेध केला.

“ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. मनमोकळेपणाने बोलण्याचा आणि वास्तव समोर आणण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे,” असे त्या म्हणाल्या.

विद्यार्थ्यांनी वास्तव समोर आणण्यासाठी व्हिडिओ काढले आणि तक्रारी केल्या तर त्याला गुन्हा मानणे चुकीचे असल्याचे सांगत सुळे म्हणाल्या की, “आमच्या मुलांनी जर वास्तव समोर आणलं आणि तो जर गुन्हा असेल, तर मी स्वतः तो गुन्हा करेन आणि मग आम्हाला या सरकारने जेलमध्ये टाकावे.”

SIR मुदतवाढीवर कार्यकर्त्यांना आवाहन

SIR यादीबाबत बोलताना सुळे यांनी मुदतवाढ मिळाल्याचे सांगितले. ज्यांची नावे यादीत राहिली आहेत किंवा नावामध्ये काही चूक आहे, त्यांना दुरुस्ती करण्यासाठी पुढील दोन महिन्यांचा कालावधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील अनुभव सांगताना अनेक नागरिकांची नावे दोन ठिकाणी आल्याचे, तर काही ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील दोन महिने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कामासाठी प्रयत्न करतील, असेही त्यांनी सांगितले.

मोदींच्या बारामती दौऱ्यावर सुळे म्हणाल्या, “कन्फर्मेशननंतर कळवू”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १६ ऑक्टोबरच्या बारामती दौऱ्याबाबतही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. मोदींना पत्र लिहिण्यात आले असून कार्यक्रम कसा असेल, तारीख निश्चित आहे का किंवा त्यात एक-दोन दिवसांचा बदल होणार आहे का, याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

“कन्फर्मेशनचं पत्र आल्यानंतर कळवू,” असे सुळे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी शरद पवार गट NDAमध्ये जाणार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष NDAसोबत जाणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता सुळे यांनी मिश्कील टिप्पणी केली. “आमची चर्चा बारा वर्षे चालते, त्यामुळे बारा वर्षे आम्ही जाणार असे तुमचे सर्व चॅनेलवाले दाखवतात. आणखी तीन वर्षे चालू दे, काही हरकत नाही. तुम्हालाही तुमचा चॅनेल चालवायचा आहे,” असे त्या म्हणाल्या.

आपला पक्ष सध्या विरोधी पक्षात असून गेल्या बारा वर्षांपासून विरोधी पक्षात राहून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण निष्ठेने काम करत असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

Back to top button