इंदापूर

गुप्त माहिती अन् मध्यरात्री कारवाई; इंदापूर पोलिसांच्या हाती लाखोंचा गुटखा

१५.८७ लाखांचा विमल गुटखा अन् ८ लाखांची पिकअप जप्त

गुप्त माहिती अन् मध्यरात्री कारवाई; इंदापूर पोलिसांच्या हाती लाखोंचा गुटखा

१५.८७ लाखांचा विमल गुटखा अन् ८ लाखांची पिकअप जप्त

इंदापूर;प्रतिबंधि

गुटख्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनावर इंदापूर पोलिसांनी धडक कारवाई करत १५ लाख ८७ हजार ६४० रुपये किमतीचा विमल गुटखा आणि ८ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन, असा एकूण २३ लाख ८७ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहनचालक आजमखान महमूद पठाण (रा. सरस्वतीनगर, इंदापूर) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार इंदापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली.
२० ऑगस्ट रोजी मध्यरात्री सहायक फौजदार प्रकाश माने यांना पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे व विजय कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हायवे मार्गावर वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली.
दरम्यान, बावड्याकडून येणाऱ्या एमएच ४२ BU १०२९ क्रमांकाच्या पिकअप वाहनावर पोलिसांना संशय आला. वाहन थांबवून तपासणी केली असता हौद्यात मागील बाजूस रिकामे कॅरेट लावलेले आढळले. त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विमल गुटख्याचा साठा आढळून आला.
पोलिसांनी १५ लाख ८७ हजार ६४० रुपयांचा गुटखा आणि ८ लाख रुपयांचे पिकअप वाहन जप्त केले. तपासादरम्यान हा गुटखा कर्नाटकातील तिकोटा येथून कमलेश नामक व्यक्तीकडून विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन गुटख्याची पाहणी केल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे व पोलिस कॉन्स्टेबल हसीम मुलाणी करीत आहेत.
ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चेतन्य कदम आणि पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रकाश माने, पोलिस हवालदार सलमान खान, सुकुमार भोसले तसेच पोलिस कॉन्स्टेबल गणेश मुंडे, महेश माने, सचिन शिंदे, प्रशांत साळवे, राहुल उदागे, वेदांत कोळी आणि वैभव गरड यांच्या पथकाने केली.

Back to top button