बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर पिंजऱ्यात बसून आंदोलन; खांडजच्या ग्रामस्थांचा वनविभागाविरोधात संताप
शेतात जाणे, शेतीची कामे करणे तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक झाले

बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर पिंजऱ्यात बसून आंदोलन; खांडजच्या ग्रामस्थांचा वनविभागाविरोधात संताप
शेतात जाणे, शेतीची कामे करणे तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक झाले
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील खांडज गाव आणि परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून बिबट्याचा वावर सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षितता मिळावी, या मागणीसाठी सोमवारी (२४ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता संतप्त ग्रामस्थांनी बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, बिबट्याच्या सततच्या वावरामुळे शेतात जाणे, शेतीची कामे करणे तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक झाले आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊनही वनविभागाकडून अपेक्षित ती तातडीची कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी यापूर्वी प्रांताधिकारी तसेच वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, वारंवार मागणी करूनही प्रश्न कायम असल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
‘आम्हाला घरात कोंडून ठेवण्याची वेळ का आली?’
बिबट्याच्या भीतीमुळे नागरिकांना स्वतःच्या घरातही सुरक्षित वाटत नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. “आमच्या जीविताची आणि मुलांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार?” असा सवाल करत वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
पिंजऱ्यात मुलांना बसवून अनोखे आंदोलन
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. प्रशासकीय भवनासमोर लोखंडी पिंजरा उभारून त्यामध्ये लहान मुलांना बसवण्यात आले. पिंजऱ्याच्या वर बिबट्याची प्रतिकृती ठेवण्यात आली असून, ‘आमचा जीव गुदमरतोय, आमच्या लेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न तात्काळ सोडवा’, असा संदेश देणारे फलकही लावण्यात आले.
या आंदोलनातून खांडजमधील नागरिकांच्या मनातील भीती आणि संताप प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बिबट्याचा शोध घेऊन त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे व कॅमेरे लावावेत आणि वनविभागाने नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि वनविभागाकडून कोणती भूमिका घेतली जाते, तसेच खांडज परिसरातील बिबट्याच्या समस्येवर तातडीने कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.






