शैक्षणिक

बारामतीतील टी.सी. महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

NEP 2020 अंतर्गत कौशल्याधारित शिक्षणावर मंथन; २५० विद्यार्थ्यांचा सहभाग, ४० संशोधनपर शोधनिबंधांचे सादरीकरण

बारामतीतील टी.सी. महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

NEP 2020 अंतर्गत कौशल्याधारित शिक्षणावर मंथन; २५० विद्यार्थ्यांचा सहभाग, ४० संशोधनपर शोधनिबंधांचे सादरीकरण

बारामती वार्तापत्र 

अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात (टी.सी. महाविद्यालय) ‘विकसित भारतासाठी NEP 2020 अंतर्गत कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी : नवोपक्रम, रोजगारक्षमता आणि उद्योजकता’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न झाली.

२२ ऑगस्ट रोजी झालेल्या उद्घाटन समारंभात संभाजीनगर येथील रवी मसालेचे व्यवस्थापकीय संचालक व उद्योजक फुलचंद जैन यांनी विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण घेत असतानाच उद्योजकतेचा निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. अन्नप्रक्रिया उद्योगातील संधी, आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि ग्राहकांचा विश्वास यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष डॉ. सचिन गाडेकर यांनी NEP 2020 आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळासोबतच नवीन उद्योजक घडतील, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. भगवान साखले, मेघना बडजाते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अभिनंदन शहा उपस्थित होते. रतन टाटा महाराष्ट्र स्टेट स्किल्स युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी ऑनलाइन माध्यमातून परिषदेच्या आयोजनास शुभेच्छा दिल्या.

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सायबर सुरक्षा तज्ज्ञ धनंजय देशपांडे यांनी हनी ट्रॅप, डिजिटल अरेस्ट, लाईट बिल फ्रॉड आणि एक्सिडेंट फ्रॉड यांसारख्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे सांगत नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले.

सोशल मीडियावर खासगी माहिती, कुटुंबीयांचे फोटो, प्रवासाची माहिती किंवा संपत्तीविषयक छायाचित्रे अनावश्यकपणे शेअर करू नयेत. संशयास्पद माहितीची फॅक्ट-चेकद्वारे खातरजमा करावी, अनावश्यक ठिकाणी आधारकार्डची प्रत देऊ नये तसेच ऑनलाइन बँकिंग, ई-मेल आणि UPI चे पासवर्ड नियमितपणे बदलावेत, असा सल्ला देशपांडे यांनी दिला. सायबर गुन्हा घडल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइनवर तक्रार करून पोलिसांची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

विद्यार्थ्यांनी कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपप्राचार्या डॉ. प्रा. योगिनी मुळे यांनी बदलत्या रोजगारव्यवस्थेचा विचार करून राष्ट्रीय परिषदेचा विषय निश्चित करण्यात आल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी नवीन कौशल्ये आत्मसात करावीत, इंटर्नशिप व विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे आणि उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

‘असोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट्स अँड टेक्नॉलॉजिस्ट्स ऑफ इंडिया’ महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष उमेश कांबळे यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ध्येय निश्चित करण्याचा सल्ला दिला. ग्लोबल अॅग्रोव्हेट, पुणेचे सीईओ विकास वणवे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या राष्ट्रीय परिषदेत २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. देशभरातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून ४० संशोधनपर शोधनिबंध प्राप्त झाले असून त्यांचे प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन सादरीकरण करण्यात आले. याशिवाय पोस्टर प्रेझेंटेशन आणि फूड प्रॉडक्ट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

परिषदेला अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह वाघोलीकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.

परिषद यशस्वी करण्यासाठी फूड टेक्नॉलॉजी, मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, मीडिया ग्राफिक्स अँड अॅनिमेशन आणि डेअरी टेक्नॉलॉजी विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button