शैक्षणिक

बारामतीत विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; महाराष्ट्रातील पहिले ‘बँकिंग रिसोर्स सेंटर’ विद्या प्रतिष्ठानमध्ये

१५० विद्यार्थ्यांना १०० तासांचे मोफत प्रशिक्षण.

बारामतीत विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; महाराष्ट्रातील पहिले ‘बँकिंग रिसोर्स सेंटर’ विद्या प्रतिष्ठानमध्ये

१५० विद्यार्थ्यांना १०० तासांचे मोफत प्रशिक्षण.

बारामती वार्तापत्र 

विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा, आधुनिक तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधींची माहिती मिळावी, तसेच त्यांना करिअरसाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे महाराष्ट्रातील पहिले ‘बँकिंग रिसोर्स सेंटर’ सुरू करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य माहिती तंत्र सहाय्यता केंद्र आणि विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाणिज्य विभागांतर्गत या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, महाराष्ट्र राज्य माहिती तंत्र सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे आणि उन्नती फाउंडेशनच्या संचालिका सारिका शहा यांच्या हस्ते केंद्राचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
या केंद्राच्या माध्यमातून पुढील दोन महिन्यांत १५० विद्यार्थ्यांना तब्बल १०० तासांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बँकिंग क्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षा, आवश्यक कौशल्ये, आधुनिक तंत्रज्ञान तसेच रोजगाराच्या उपलब्ध संधी याबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य माहिती तंत्र सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण प्रगतीसाठी ‘करिअर कट्टा’च्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षांसह एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
उन्नती फाउंडेशनच्या संचालिका सारिका शहा यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षा तसेच करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील संधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे सांगितले. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी बँकिंग क्षेत्रातील वाढत्या संधींचा अभ्यास करून आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीला योग्य दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थीप्रिय आणि कौशल्यविकासाला चालना देणारे उपक्रम राबविण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाचा नेहमीच पाठिंबा असतो, असेही डॉ. शिंदे यांनी नमूद केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
यावेळी सीएमए फाउंडेशन परीक्षेत प्रथम प्रयत्नात यश मिळवल्याबद्दल वाणिज्य विभागातील कु. प्रतीक्षा सातव आणि कु. साक्षी पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पीक कीड नियंत्रण विषयावर पेटंट मिळवल्याबद्दल ॲग्री-बायोटेक विभागातील कु. पूर्वा वानखेडे यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी करिअर कट्टाचे समन्वयक डॉ. सुनील ओगले, जिल्हा समन्वयक डॉ. संजय खिलारे, उपप्राचार्य डॉ. भीमराव मोरे, डॉ. अमर भोसले, डॉ. कांचन खिरे, अक्षय शिंदे, छाया पाटील, प्रियंका तांबे, आरती वाबळे, अन्विशा हाटकर आणि मारुती रसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार असून, बारामतीसह परिसरातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Back to top button