सख्ख्या भावांनी भागाकारात रचला विक्रम; श्रीयशला ‘ग्रँड मास्टर’ किताब, वेदांतचीही विक्रमी कामगिरी
कुटुंबाकडूनही कौतुक..

सख्ख्या भावांनी भागाकारात रचला विक्रम; श्रीयशला ‘ग्रँड मास्टर’ किताब, वेदांतचीही विक्रमी कामगिरी
कुटुंबाकडूनही कौतुक..
डोळ्यांवर पट्टी बांधून अवघड गणिती उदाहरणे अवघ्या एका मिनिटांत अचूक सोडविण्याची विलक्षण कामगिरी सख्ख्या भावांनी केली आहे. श्रीयश अमित सिद पाटील आणि वेदांत या भावांनी भागाकाराच्या गणितात उल्लेखनीय विक्रम नोंदवत आपल्या असामान्य बुद्धिमत्तेची प्रचिती दिली.

श्रीयश अमित सिद पाटील याने वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी डोळ्यांवर पट्टी बांधून केवळ एका मिनिटात चार अंकी संख्येला एक अंकी संख्येने भाग देत अचूक उत्तर दिले. त्याच्या या कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ तसेच ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला ‘ग्रँड मास्टर’ किताबाने गौरविण्यात आले.

दरम्यान, त्याचा धाकटा भाऊ वेदांत अमित सिद पाटील यानेही भावाच्या पावलावर पाऊल ठेवत विक्रमी कामगिरी केली. वेदांतने डोळ्यांवर पट्टी बांधून अवघ्या एका मिनिटात तब्बल २१ भागाकारांची अचूक उत्तरे कागद-पेनच्या साहाय्याशिवाय दिली. त्याच्या या कामगिरीची नोंदही ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली असून, त्याला मानाचा किताब प्रदान करण्यात आला.
कुटुंबाकडूनही कौतुक
श्रीयश सध्या इयत्ता नववीत, तर वेदांत इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. दोघेही लोणी काळभोर परिसरातील शाळेत शिक्षण घेत असून, त्यांचे वडील अमित सिद पाटील हे पुणे शहर पोलिस दलात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी नुकतेच दोन्ही भावांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करून कौतुक केले.






