स्थानिक

बारामतीतून सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल!

“महाराष्ट्रात कुठे आंदोलन होत नाही, सांगा मला!”; सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

बारामतीतून सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल!

“महाराष्ट्रात कुठे आंदोलन होत नाही, सांगा मला!”; सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

बारामती वार्तापत्र 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये आयोजित करण्याच्या निर्णयावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार साधारणपणे दिल्लीत दिले जातात. गेल्या सत्तर वर्षांत असे काय घडले की जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला?” असा सवाल करत, “मी स्वतः भारत सरकारला पत्र लिहिणार असून हा सोहळा दिल्लीतच झाला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

राज्यातील एसटी वाहतूक व्यवस्थेवरही सुळे यांनी सरकारला घेरले. नवीन बसेस खरेदी करण्यापेक्षा पूर्वीच्या सुमारे ७०० बसेस धूळखात पडल्या असून मनुष्यबळाचा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले. “दोन-तीनशे कोटी रुपये योग्य पद्धतीने खर्च केले तर एसटीमध्ये क्रांती घडू शकते; मात्र सरकारला अशा गोष्टींसाठी वेळ नाही,” अशी टीका त्यांनी केली.

🌾 दुष्काळी परिस्थितीवर सर्वपक्षीय बैठकीची मागणी

राज्यातील पावसाची स्थिती आणि शेतीसमोरील संकट गंभीर असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी सुळे यांनी केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करताना त्यांनी हमीभाव, तांदूळ उत्पादनातील घट आणि साखर उद्योगातील अडचणींचाही उल्लेख केला.

“फसवी कर्जमाफी केली असेल तर त्यात सुधारणा करा आणि राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या,” असे त्या म्हणाल्या.

🚨 “कुठे आंदोलन होत नाही, सांगा मला!”

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा अकरावा दिवस, ओबीसी समाजाचे आंदोलन, महिला आंदोलन तसेच एमपीएससी-यूपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन याकडे लक्ष वेधत सुळे यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“आज राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. कुठे आंदोलन होत नाही, सांगा मला,” असा सवाल त्यांनी केला.

ऊस गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्या मुद्द्यावर शेतकरी संघटनांचा विरोध असल्याने सरकारने संबंधितांशी चर्चा करून मार्ग काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.

🔊 डीजेच्या मुद्द्यावरही सरकारला सुनावले

डीजेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची विनंती केल्याचे सुळे यांनी सांगितले. “डीजेला प्राधान्य न देता नियमावलीप्रमाणे तो चालला पाहिजे. कोर्ट जो निर्णय देते, त्याची अंमलबजावणी करा आणि विषय संपवून टाका,” असे त्यांनी स्पष्ट केले.

🇮🇳 पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी सुळेंची मागणी

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी थेट मागणी केली—“देशाच्या प्रधानमंत्र्यांना एवढीच विनंती आहे, महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करा.”

“महाराष्ट्रात तुमच्या आणि मित्रपक्षांच्या मिळून २०० आमदारांचे सरकार आहे. महाराष्ट्र आज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आहे. शेतकरी, अन्नधान्य, महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे,” असेही त्या म्हणाल्या.

Back to top button