बारामतीत गौणखनिज साठ्याची निविदा प्रक्रिया सुरू; २१ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण रक्कम भरण्याची मुदत
१९५ ब्रास माती, मुरूम अन् दगड विक्रीसाठी उपलब्ध

बारामतीत गौणखनिज साठ्याची निविदा प्रक्रिया सुरू; २१ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण रक्कम भरण्याची मुदत
१९५ ब्रास माती, मुरूम अन् दगड विक्रीसाठी उपलब्ध
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील होळ-सस्तेवाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावाच्या उत्खननातून उपलब्ध झालेला १९५ ब्रास माती, मुरूम व दगडाचा गौणखनिज साठा विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. या साठ्याच्या विक्रीसाठी इच्छुकांकडून बंद लिफाफ्यात निविदा मागविण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, खनिकर्म शाखा, पुणे यांच्या सूचनेनुसार ही निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आपली निविदा निवासी नायब तहसीलदार, बारामती यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
या १९५ ब्रास गौणखनिज साठ्यासाठी १ लाख १७ हजार रुपये लघुत्तम किंमत निश्चित करण्यात आली आहे. निविदेसोबत २५ हजार रुपयांचा अनामत रकमेचा धनादेश तहसीलदार, बारामती यांच्या नावे सादर करावा लागणार आहे.
निविदाधारकाने आधारकार्ड आणि पॅनकार्डद्वारे ओळखीचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. निविदा सादर करण्याची मुदत संपल्यानंतर १७ सप्टेंबर रोजीच निविदांचे लिफाफे उघडण्यात येणार आहेत.
मंजूर निविदाधारकास जिल्हा खनिज प्रतिष्ठाणचा १० टक्के निधी, २ टक्के टीडीएस तसेच भूपृष्ठ भाडे लागू राहणार आहे. निविदेची संपूर्ण रक्कम २१ सप्टेंबर २०२६ पर्यंत भरणे आवश्यक राहणार आहे.
निविदेतील इतर अटी व शर्ती संबंधित आदेशामध्ये नमूद करण्यात येणार असल्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी कळविले आहे.






