धन मिळते म्हणे! अंधश्रद्धेला फाटा; बारामतीत मांडूळाची सुरक्षित सुटका
‘दगड मारू नका!’ पोलिसांनी रोखला हल्ला

धन मिळते म्हणे! अंधश्रद्धेला फाटा; बारामतीत मांडूळाची सुरक्षित सुटका
‘दगड मारू नका!’ शहर पोलिसांनी रोखला हल्ला
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील गिरीराज हॉस्पिटल परिसरात मांडूळ जातीचा सर्प आढळल्यानंतर काही नागरिकांकडून त्याला दगडाने मारण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र वन्यजीवप्रेमी अभिजीत हराळे यांच्या सजगतेमुळे हा प्रकार थांबला आणि बारामती शहर पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपाने मांडूळाचा जीव वाचला.
सर्पाला इजा होत असल्याचे लक्षात येताच हराळे यांनी तात्काळ बारामती शहर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर आणि पोलीस हवालदार यशवंत पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी नागरिकांना सर्पाला इजा न करण्याचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मांडूळ चुकीच्या व्यक्तींच्या ताब्यात जाऊ नये, याची खबरदारी घेत त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
मांडूळ अर्थात Red Sand Boa (Eryx johnii) हा पर्यावरणीय साखळीतील महत्त्वाचा सर्प आहे. मात्र त्याच्याबाबत धनप्राप्ती, जादूटोणा, गुप्तधन आणि तांत्रिक विधी यांसारख्या अंधश्रद्धा समाजात प्रचलित आहेत. या चुकीच्या समजुतींमुळे मांडूळांची बेकायदेशीर पकड, तस्करी आणि गैरवापर होण्याचा धोका असतो. या अंधश्रद्धांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही, असा संदेशही या घटनेतून देण्यात आला.
पोलिसांनी वनविभागाशी संपर्क साधून अधिकारी बनसोडे यांना पोलीस ठाण्यात पाचारण केले. त्यांनी मांडूळाचा सुरक्षित ताबा घेतला. त्यानंतर रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वनविभागाने मांडूळाला योग्य नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त केले.
वन्यजीवप्रेमीची सजगता, पोलिसांची तात्काळ कारवाई आणि वनविभागाचा समन्वय यामुळे रस्त्यावर जीव धोक्यात आलेल्या वन्यजीवाला नवजीवन मिळाले.
मांडूळ किंवा अन्य कोणताही वन्यजीव आढळल्यास त्याला दगड मारू नये, स्वतः पकडू नये किंवा कोणाच्याही ताब्यात देऊ नये. तात्काळ वनविभाग किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.
“अंधश्रद्धेवर विश्वास नको, वन्यजीवांचे संरक्षण करूया!”






