इंदापूर

‘बोलण्याच्या ओघात’ पुन्हा शब्द निसटले! कृषिमंत्री भरणेंच्या वक्तव्याची इंदापूरात चर्चा

वक्तव्य आधी, दिलगिरी नंतर!

बोलण्याच्या ओघात’ पुन्हा शब्द निसटले! कृषिमंत्री भरणेंच्या वक्तव्याची इंदापूरात चर्चा

वक्तव्य आधी, दिलगिरी नंतर!

इंदापूर | प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील रुई येथे श्री बाबीर देवस्थान मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या एका वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीतच भाषण करताना भरणे यांनी बोलण्याच्या ओघात ‘दिवंगत उद्धव ठाकरे’ असा उल्लेख केला.

धार्मिक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाषण सुरू असताना हा उल्लेख झाला. मात्र काही क्षणांतच आपली चूक लक्षात आल्यानंतर भरणे यांनी त्याच व्यासपीठावरून दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे वक्तव्यापेक्षा त्यानंतरच्या दिलगिरीचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

२०२१ मधील वक्तव्याची पुन्हा आठवण

भरणे यांच्या ताज्या वक्तव्यामुळे २०२१ मधील एका वादग्रस्त वक्तव्याचीही आठवण करून दिली जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सोलापूर शहरातील सभेत बोलताना भरणे यांनी “मुख्यमंत्री जाऊ द्या, मरू द्या… मी तुम्हाला निधी देतो” असे वक्तव्य केल्याचे त्यावेळी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले होते.

त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. या वक्तव्यावरून शिवसेना नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. वाद वाढल्यानंतर भरणे यांनी माफी मागत, बोलण्याच्या ओघात शब्द निघून गेल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

‘बोलण्याच्या ओघात’ की राजकीय बेफिकिरी?

आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याने मंत्र्यांच्या भाषणातील शब्दांची निवड आणि वक्तव्यांचे गांभीर्य यावर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

चूक लक्षात आल्यानंतर दिलगिरी व्यक्त करणे ही सकारात्मक बाब असली, तरी जबाबदार घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीकडून वारंवार वादग्रस्त शब्दप्रयोग होणे आणि त्यानंतर स्पष्टीकरण किंवा दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ येणे, यावर राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

Back to top button