सुपा

सुपे घाटात शालेय विद्यार्थ्यांच्या एसटी बसचा थरारक अपघात; २५ ते ३० विद्यार्थी होते प्रवासात

बारामती तालुक्यातील सुपे घाटात शालेय विद्यार्थ्यांच्या एसटी बसचा थरारक अपघात; २५ ते ३० विद्यार्थी होते प्रवासात

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना दिला दिलासा

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील सुपे घाटात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. पाटसहून सुप्याच्या दिशेने जात असताना घाट चढताना बस अचानक मागे सरकल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २० बीएल ३१२१ क्रमांकाची बारामती आगाराची एसटी बस पाटसहून सुप्याकडे निघाली होती. या बसमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या शाळेतील सुमारे २५ ते ३० विद्यार्थी प्रवास करत होते. सुपे घाट चढत असताना बस पुढे जाण्याऐवजी अचानक मागे सरकू लागली. चालकाने बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र बस काही अंतर मागे जाऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली.

अपघातात २ ते ३ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना पुढील उपचारासाठी चौफुला येथील हर्ष हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत नसल्याची प्राथमिक माहिती आहे. इतर विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुपे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले.

या अपघातामुळे काही काळ पाटस-सुपा मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. बसचा तांत्रिक बिघाड झाला होता की अन्य कोणत्या कारणामुळे अपघात घडला, याचा तपास पोलीस तसेच संबंधित विभागाकडून सुरू आहे.

सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली.

Back to top button