इंदापूर

कर्ज मिळाले नाही, तरी ३.२० लाखांचा बोजा! मौलाना आझाद योजनेत सणसरच्या लाभार्थ्यांचा गंभीर दावा

२० कोरे चेक, हजारोंची मागणी आणि कर्जाचा बोजा?

कर्ज मिळाले नाही, तरी ३.२० लाखांचा बोजा! मौलाना आझाद योजनेत सणसरच्या लाभार्थ्यांचा गंभीर दावा

२० कोरे चेक, हजारोंची मागणी आणि कर्जाचा बोजा?

‘लोन कमी करण्याचे पत्र देतो’ म्हणाले; बोजा मात्र कायम!

इंदापूर;प्रतिनिधि

इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुस्लिम समाजातील लाभार्थ्यांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेबाबत गंभीर आरोप केले आहेत. कर्ज मंजूर झाल्याचे सांगून मंजुरीपत्रे देण्यात आली; मात्र प्रत्यक्ष मंजूर कर्जाची रक्कम अद्याप मिळाली नसल्याचा दावा लाभार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, कर्जाची रक्कम हातात न पडताच लाभार्थ्यांच्या घर व शेतीवर सुमारे ३ लाख २० हजार रुपयांचा कर्जबोजा चढविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच कर्जाची रक्कम न मिळाल्यास निर्माण झालेला बोजा तात्काळ कमी अथवा रद्द करावा, अशी मागणी सणसर येथील मुस्लिम बांधवांनी पत्रकार परिषदेत केली.

लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुणे येथील अल्पसंख्याक कार्यालयात जमा करण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये कर्ज मंजूर झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र मंजुरीनंतरही प्रत्यक्ष रक्कम खात्यावर जमा झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, कार्यालयाकडून वारंवार वेगवेगळी कागदपत्रे मागविण्यात आली. लाभार्थ्यांनी मागितलेली कागदपत्रे वेळोवेळी सादर करूनही कर्जाची रक्कम मिळाली नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

‘३ ते ४ हजार रुपये घेतले’ असा आरोप

या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्येक लाभार्थ्याकडून अंदाजे ३ हजार ते ४ हजार रुपये घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आरोपाचीही अधिकृत चौकशी व्हावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

मंजुरीपत्र वाटले; कर्जाची रक्कम मात्र नाही!

जानेवारी २०२५ मध्ये इंदापूर येथे कर्ज मंजुरीपत्र वाटपाचा कार्यक्रम झाल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले. संबंधित प्रतिनिधी तसेच तत्कालीन अल्पसंख्याक मंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाल्याचे पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले. त्यावेळी कर्जाची रक्कम मिळणार असल्याचे सांगण्यात आले; मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष रक्कम मिळाली नसल्याचा दावा लाभार्थ्यांनी केला.

२० कोरे चेक सही करून घेतल्याचा आरोप

यापेक्षाही गंभीर आरोप म्हणजे, प्रत्येक लाभार्थ्याकडून २० कोरे चेक सही करून घेण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. कर्जाची रक्कम मिळालेली नसतानाही कर्जाचा बोजा निर्माण झाल्याने लाभार्थ्यांनी या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘लोन कमी करण्याचे पत्र देतो’… पण बोजा कायम?

कर्जाची रक्कम मिळत नसल्याने लाभार्थ्यांनी संबंधित कार्यालयाकडे विचारणा केली असता, ‘लोन कमी करण्याचे पत्र देतो’ असे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र अद्याप कर्जाचा बोजा कमी झालेला नाही आणि मंजूर कर्जाची रक्कमही मिळालेली नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.

कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले, मंजुरीपत्रे दिली, कागदपत्रांची पूर्तता करून घेतली; मात्र रक्कम नाही आणि उलट कर्जाचा बोजा कायम, या विरोधाभासी परिस्थितीमुळे सणसरमधील लाभार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून प्रत्यक्षात कर्जाची रक्कम कुठे अडली, कर्जाचा बोजा कोणत्या प्रक्रियेतून निर्माण झाला आणि लाभार्थ्यांकडून कथितरित्या घेतलेल्या पैशांची वस्तुस्थिती काय आहे, याचा खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

लाभार्थ्यांना मंजूर कर्जाची रक्कम मिळवून द्यावी आणि रक्कम न मिळाल्यास त्यांच्या मालमत्तेवर निर्माण झालेला कर्जबोजा तात्काळ कमी अथवा रद्द करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Back to top button