बारामतीत अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा दणका! सलग दोन दिवस छापे; बांदलवाडीत १८ बाटल्या, जळोचीत १० लिटर गावठी दारू जप्त
अवैध धंद्यांना आश्रय नाही; माहिती मिळाल्यास कायदेशीर कारवाई निश्चित,”

बारामतीत अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा दणका! सलग दोन दिवस छापे; बांदलवाडीत १८ बाटल्या, जळोचीत १० लिटर गावठी दारू जप्त
अवैध धंद्यांना आश्रय नाही; माहिती मिळाल्यास कायदेशीर कारवाई निश्चित,”
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. सलग दोन दिवस करण्यात आलेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये बांदलवाडी येथे देशी दारूच्या १८ बाटल्या, तर जळोची येथे अंदाजे १० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३५ वाजता बारामती-इंदापूर रोडवरील बांदलवाडी परिसरात बेकायदेशीर देशी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पंचांसह छापा टाकण्यात आला. या कारवाईत लक्ष्मण बापू जोशी (वय ६५, रा. बांदलवाडी) यांच्या ताब्यातून ‘टँगो पंच’ नावाच्या ९० मिली क्षमतेच्या १८ सिलबंद देशी दारूच्या बाटल्या, एकूण किंमत ₹७२०, जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३९४/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे करीत आहेत.
तसेच, दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी जळोची गावच्या हद्दीत बैलबाजाराजवळ पत्र्याच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत रंजना सोमनाथ कुदळे (वय ४५, रा. जळोची, बारामती) यांच्या ताब्यातून पांढऱ्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये अंदाजे १० लिटर तयार गावठी दारू, किंमत ₹१,०००, जप्त करण्यात आली. आवश्यक नमुना घेऊन कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३८९/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाया पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, प्रभारी परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा ओमासे आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी आणि तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.
बारामती शहर पोलिसांकडून अवैध गावठी दारू, दारू गुत्ते, बेकायदेशीर ताडी विक्री, मटका-जुगार, अमली पदार्थांची विक्री तसेच इतर समाजविघातक कृत्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी परिसरात अशा प्रकारचे अवैध धंदे आढळल्यास डायल ११२, बारामती शहर पोलीस ठाणे किंवा जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिस्थिती सुरक्षित असल्यासच फोटो किंवा व्हिडिओ स्वरूपात पुरावा उपलब्ध करून द्यावा. नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये किंवा संबंधित व्यक्तींशी वाद घालू नये, असेही पोलिसांनी सांगितले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख शक्य तितकी गोपनीय ठेवण्यात येईल.
“अवैध धंद्यांना आश्रय नाही; माहिती मिळाल्यास कायदेशीर कारवाई निश्चित,” असा स्पष्ट इशारा बारामती शहर पोलिसांकडून देण्यात आला आहे.






